जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील चिखलगाव नजिक असलेल्या रेल्वे क्रॉसिंग जवळील विद्यानगरीत चांगलाच धुमाकुळ घातला. यात चोरट्यांनी एक घरफोडी केली. मात्र दुसरी घरफोडी करताना घरमालकाला दरवाजा उघडताना आवाज आला. त्यामुळे घरमालकाने आरडाओरड केल्याने चोरटे तिथून पळून गेले.
सध्या पोळ्या निमित्त अनेक लोक सण साजरा करण्यासाठी बाहेर गेले आहेत. याचाच फायदा चोरट्यांनी दिनांक 15 सप्टेंबर शुक्रवारच्या मध्यरात्री घेतला. विद्यानगरीत चोरट्यांनी धनराज डवरे यांच्या घरी कुलूप फोडून प्रवेश केला. त्यांनी आलमारीचे कुलूप फोडून सामान अस्ताव्यस्त केले. सकाळी ही बाब उघडकीस आली. या चोरीत चोरट्यांच्या हाती किती मुद्देमाल लागला हे स्पष्ट झाले नाही.
चोरट्यांचा डाव फसला
प्रकाश धुळे हे विद्यानगरी येथील रहिवासी आहे. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमाराच ते घरी झोपून होते. दरम्यान चोरट्यांनी किचनमधल्या दरवाजातून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे झालेल्या आवाजामुळे धुळे यांना जाग आली. त्यांनी चोर, चोर अशी आरडा ओरड केल्याने चोरांनी तिथून धूम ठोकली.
बंद घर म्हणजे घरफोडी असे एक समिकरण झाले आहे. चोरटे सध्या वणी शहराच्या आउटसाईड असलेला परिसर चोरट्यांच्या निशान्यावर आहे. अलिकडेच पोलिसांनी काही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र अद्यापही चोरीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वणीकरांमध्ये चोरट्यांची दहशत अद्यापही कायम आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा वणीकर करीत आहे.
Comments are closed.