अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

सुरजापूर येथी रेतीघाटधारकाने केला अनोखा विक्रम, सुपरफास्ट तत्परता दाखवून प्रशासनानेही लावला विक्रमात हातभार

1

जब्बार चीनी, वणी: परवानगी मिळाल्यानंतर एका दिवसात तब्बल 600 ब्रास रेतीसाठा केला जाऊ शकतो, यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हा विक्रम करून दाखवला आहे तो सुरजापूर येथील एका घाटधारकाने. लालफितीत काम अडकले की चपला झिजतात मात्र काम होत नाही. असे असतानाही या कामी महसूल प्रशासनानेही सुपरफास्ट तत्परता दाखवत या विक्रमाला हातभार लावला. ई-टीपी, शासकीय तत्परता, अप्रतिम मनुष्यबळ, जबरदस्त नियोजन इत्यादी कौशल्याच्या आधारे हा रेकॉर्ड करणे शक्य झाले आहे. जाणून घेऊ या या अनोख्या विक्रमाची कहाणी…  

मौजा शिरपूर येथील गट क्र. 54 क्षेत्र 0.93 येथे जितेंद्र महादेव बांदुकर यांच्या मालकीचे शेत आहे. यांच्या शेतात घाटधारक संजय रामचंद्र जुनगरी यांचा रेतीसाठा आहे. दिनांक 9 जून रोजी शिरपूर येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी या ठिकाणी तपासणी केली असता येथे 600 ब्रास रेतीसाठा आढळून आला. घटनास्थळी संजय जुनगरी हे हजर होते. त्यांना महसूलच्या कर्मचा-यांनी रेतीसाठ्याबाबत विचारणा केली असता त्यांनी या रेतीसाठ्याची परवानगी असून या संबंधीची रॉयल्टी व कागदपत्र सध्या जवळ नसल्याची माहिती दिली. कर्मचा-यांनी सदर घटनेचा पंचनामा केला व प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सोपवले.

9 जून रोजीच तहसीलदारांनी सदर प्रकरण पंजीबद्ध करून संबंधीतास नोटीस काढण्याचा आदेश पारीत केला. यात त्यांनी घाटधारकास 10 जून पर्यंत 600 ब्रास रेतीच्या रॉयल्टीबाबत लेखी जबाब मागवला. शनिवारी 12 जून रोजी तहसीलदार शाम धनमने यांनी सदर 600 ब्रास रेतीसाठा वैध असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला दिली.

महसूल प्रशासनाची ‘सुपरफास्ट’ तत्परता
शेतमालक जितेंद्र बांदुरकर यांनी त्यांच्या मालकीची गट क्र. 54 येथे असलेली 0.93 हेक्टर जमीन ही अकृषक (NA) करण्यासाठी दिनांक 31 मे रोजी अर्ज केला. मात्र अनावधानाने त्यात थोडी खोडतोड झाली. त्याच दिवशी सुटीवर असलेले तहसीलदार शाम धनमने हे देखील रुजू झाले. हा निव्वळ योगायोग आहे. विश्रांतीनंतर लगेच जॉईन झाल्याझाल्या त्यांनी कामाचा सपाटा सुरु करत त्याच दिवशी मंडळ अधिकारी शिरपूर व सुरजापूर ग्रामपंचायत सचिवांना पत्र देऊन या प्रकऱणी अभिप्राय मागितला. 4 जून रोजी मंडळ अधिकारी व सचिवांनी या प्रकरणी संमती दिली. मात्र ग्रामपंचायतीचे सचिव या ना हरकत प्रमाणपत्रावर जावक क्रमांक टाकायला विसरले.

‘नेम काम मे देरी नही’ या उक्तीप्रमाणे या प्रकरणी जाहीरनामा 15 दिवसांऐवजी 7 दिवसांचा काढण्यात आला आणि 8 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी दिनांक 7 जून रोजी सदर जमीन एका वर्षाकरीता वाणिज्य प्रयोजन (व्यावसायिक वापरासाठी) अकृषक करण्याची परवानगीचा आदेश पारीत करण्यात आला.

दुसरीकडे सुरजापूर येथील रेती घाटधारक संजय जूनगरी यांचे देखील काम सुरूच होते. त्यांनी 27 मे रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर जागेवर (गट क्र. 54 क्षेत्र 0.93 हेक्टर) रेतीसाठा करण्याची परवानगी मिळण्याबाबत अर्ज केला. मात्र त्या अर्जावर किती रेतीसाठा करायचा आहे हे या अर्जावर नमुद करायला ते विसले. जिल्हा खनीकर्म अधिका-यांनी तत्परतेनेत्याच दिवशी तहसीलदार वणी यांना पत्र देऊन तातडीने अहवाल मागवला. दिनांक 7 जून 2021 रोजी तहसीलदारांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सकारात्मक अहवाल दिल्याने तातडीने अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्याच दिवशी म्हणजे 7 जून रोजीच घाटधारक संजय जूनगरी यांना 10 जून पर्यंत 981 ब्रास रेतीचा साठा करण्याची परवानगी दिली. 

घाट धारकाने केला अनोखा रेकॉर्ड
रेतीची वाहतूक करण्यासाठी ई-टीपी जनरेट करावी लागते. ई-टीपी ही ऑनलाईन पद्धतीने करावी लागते. वाहन क्रमांक, वाहन निघण्याचे आणि पोहोचण्याचे ठिकाण, खाणीचे नाव, खनिज, प्रमाण इटीपी ऍप फॉर्मवर नोंदविले जाते. शिवाय सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेतच खनिजाची वाहतूक करावी लागते. दिनांक 7 तारखेला परवानगी मिळाल्यानंतर 9 तारखेला महसूलच्या अधिका-यांनी तपासणी केली. तिथे त्यांना 600 ब्रास रेतीसाठा आढळून आला. म्हणजे हा साठा 8 जून रोजी करण्यात आला. रेतीचे उत्खनन हे मजुरांद्वारेच करावे लागते. त्यात जेसीबी सारख्या मशिनचा वापर करता येत नाही. मात्र घाटधारकाने फक्त मजूर लावून एका दिवसात किंवा दीड दिवसात तब्बल 600 ब्रास रेतीसाठा केला. हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. त्याबाबत त्यांनी केलेल्या मनुष्यबळ कौशल्याबाबत दाद दिलीच पाहिजे.

रेकॉर्ड करणे सोप्पे नव्हते…
एखाद्या गोष्टीचा रेकॉर्ड करायचा असेल तर त्यावर छोट्या मोठ्या गोष्टी गौन धरल्या जातात. 9 जून रोजी शेतावरच्या रेतीसाठ्याची तपासणी करून महसूल कर्मचा-यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रकरण तहसीलदारांकडे सुपुर्द केले. आता 2 दिवस आधीच म्हणजे 7 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर तहसीलदारांनी 9 तारखेला प्रकरण पंजीकृत केले ही बाब या रेकॉर्डमधली एक आडकाठीच होती. मात्र त्यावरही मात करण्यात आली. ई-टीपी जनरेट करताना वाहतुकीचा सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध असतो. 10 जूनला तहसीलदारांनी पत्र देऊनही अद्याप ऑनलाईन रॉयल्टी सादर करणे शक्य झाले नाही. मात्र त्यांच्याकडे रॉयल्टीबाबतच्या नोंदी असणारच. घाट धारकांना रेतीघाटावर कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. मात्र वीज उपलबध नसल्याने त्यांना तिथे कॅमेरे लावता आले नाही. हा रेकॉर्ड करताना नोंदी जुळवण्यात आवक जावक रजिस्टर हाताळणा-या कर्मचा-याची चांगलीच दमछाक झाली. अशा छोट्या मोठ्या अडचणींवर मात करीत अखेर 600 ब्रास  रेतीसाठ्याची किमया घाटधारकांनी करून दाखवली. याबाबत एक लाईक तर बनतोच.

अशीच तत्परता प्रशासनाने इतरही बाबतीत दाखवली तर प्रशासनावरचा विश्वास बळावण्यास मदत होईल व लालफितीत अडकलेल्या कामाबाबत लोकांमध्ये जे गैरसमज दूर होण्यासही मदत होईल. याचा कित्ता आता राज्यातील इतर भागातील महसूल विभागाने गिरवण्यास हरकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.