ITI येथे 8 मे रोजी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती मिळावी यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील शासकीय ITI येथे सोमवारी दिनांक 8 मे रोजी स. 11 ते दु. 3 या वेळेत हे शिबिर घेतले जाणार आहे. हे शिबिर नि:शुल्क असून या शिबिरात कोणत्याही 10 वी, 12 वी पास नापास किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होऊ शकतात. या शिबिरात मोठ्या संख्येने तरुणाईने सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) चे प्राचार्य प्रा. संजय तेलतुमडे यांनी केले आहे.

राज्यभरात शासनातर्फे 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वणीत हे शिबिर होत आहे. या शिबिरात इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी व बारावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

असे असणार सत्र –
स. 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर घाटंजी येथील ITI चे प्राचार्य राहुल वसंतराव पळवेकर, जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर यवतमाळ येथी दाते कॉलेजचे प्राध्यापक राम पंचभाई हे व्यक्तीमत्व विकास व करीअर कौन्सीलिंग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर युनियन बँकेचे स. प्रबंधक तुषार भगत हे शैक्षणिक व व्यावसायिक कर्ज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर संहिता गाणार या उद्योजक्ता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे संपर्क साधता येणार आहे. किंवा क्यूआर कोड (QR CODE) स्कॅन करूनही सहभागी होता येणार आहे. या शिबिराला अधिकाधिक युवक-युवतींनी नोंदणी करून शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य संजय तेलतुमडे यांनी केले आहे.

 

Comments are closed.