विवेक तोटेवार, वणी: विविध नशा करणारे काहिही प्रयोग करू शकतात. अशा नशेखोरांची अमली पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. तरीही चोरावर मोर असतोच, हे विसरून चालणार नाही. असाच एक डाव पोलीस विभागानं उधळून लावला. आयुष्याचा खेळ करणाऱ्यांचा गेम स्थानिक गुन्हे शाखेनं उधळून लावला.
जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटनासह जिल्हयात होणारी अंमली पदार्थाची वाहतुक, साठवणुक व विक्रीकरिता बाळगलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सतर्क आणि तत्पर झाली. जिल्हयात गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री होणार नाही, या दृष्टिने कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरुनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा पथक बुधवारी रात्री पाटणबोरी येथे पेट्रोलिंग करत होते. त्यांना कुणकुण लागली की, तिथल्या शिवाजी चौक परिसरात काहीतरी गडबड आहे. मग पथकानं एका संशयिताच्या घरी धाड टाकली. पुढं पोलिसांना जे दिसलं ते थक्क करणारं होतं. थोडाथोडका नव्हे तर तब्बल साडेपाच किलोंचा गांजा त्यांच्या हाती लागला. हा गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या गंगाधर पत्रीवार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पोलिसांनी राजपत्रित अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंच, मापारी, फोटोग्राफर यांना सोबत घेऊन सर्व तयारीनिशी ही कारवाई केली. पाटणबोरी येथील गंगाधर नारायण पत्रीवार याने त्याच्या घरात हा गांजा ठेवला होता. याचे एकूण वजन 5 किलो 271 ग्रॅम होते. याची बाजारात किंमत 63 हजार 576 रूपये आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात एन.डी.पी. एस. कायद्यांतर्गत पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याचा अधिक तपास पांढरकवडा पोलिस करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार दिनेश झांबरे, उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सुधीर पिदूरकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली.
Comments are closed.