बकरी चोरांना अटक, आरोपी निघाले वणीतील 2 युवक

मारेगाव येथून मध्यरात्री चोरल्या होत्या 3 बक-या, आरोपींना यवतमाळ येथे अटक

भास्कर राऊत, मारेगाव: टिनाच्या शेडमध्ये बांधलेल्या बक-या सोमवारी मध्यरात्री एका कारमधून चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मारेगाव शहरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत छडा लागला असून या प्रकरणी 2 युवकांना यवतमाळ येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या बक-या व चोरीच्या घटनेत वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी 18 वर्षांचे युवक असून ते वणीतील रहिवासी आहे. तसेच ते केवळ चोरी करण्यासाठी मारेगाव येथे गेल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की संजय कवडुजी तुरारे (38) हे मारेगावातील वार्ड क्रमांक 3 मधील रहिवासी आहे. ते शेळीपालनाचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे त्यांच्या शेळ्यांना घेऊन चरण्यासाठी जंगलात गेले होते. संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांनी घराशेजारी असलेल्या टिनाच्या शेडमध्ये या शेळ्यांना बांधले होते.

पहाटे 3 वाजताच्या सुमारास संजय यांना शेजा-यांचा कॉल आला व त्यांना कुणीतरी एका कारमध्ये शेळ्या चोरून नेत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच संजय यांनी शेडकडे धाव घेतली. दरम्यान चोरट्यांना शेळीमालक जागा झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यांची लाल रंगाची मारोती 800 कारने (MH34 C8501) पळ काढला. संजय यांनी शेळ्यांची मोजणी केली असता त्यांना बांधलेल्या बक-यांपैकी 3 बक-या चोरीला गेल्याचे कळले. ज्याची किंमत सुमारे 30 हजार आहे.

मंगळवारी दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी शेळीमालकाने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या 379 नुसार गुन्हा दाखल केला. पोहेकॉ. आनंद अलचेवार हे घटनेचा तपास करीत होते. लाल रंगाची मारोती कार ही करंजी रोडने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत त्यांनी इतर पोलीस स्टेशनला माहिती दिली.

मंगळवारी दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून मारेगाव पोलिसांना कॉल आला. त्यांना चोरीला गेलेल्या बक-या व लाल रंगाची कार मिळाल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शेळीमालक व पोलीस यवतमाळ येथे गेले असता शेळीमालकाने त्यांच्या चोरीला गेलेल्या बक-या ओळखल्या.

बकरी चोरीच्या प्रकरणाचा सुगावा लागताच पोलिसांनी आरोपी रिच रामदास कोटकर (18) रा. मंगलम पार्क वणी व सुजल अजय मोरे (18) रा. साधनकर वाडी वणी यांना अटक केली. या प्रकरणी चोरीत वापरण्यात आलेली मारोती 800 कार पोलिसांनी जप्त केली आहे. अवघ्या 24 तासांच्या आत चोरीच्या घटनेचा सुगावा लागल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. आरोपींवर 379 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.