गोतस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग, 38 जनावरांची सुटका
12 जनावरांचा मृत्यू, मध्यरात्री घडला थरार
विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी शनिवारी रात्री जनावरांचा कत्तलीसाठी जाणारा ट्रक सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला. या धडक कारवाईत 38 जनावरांची सुटका करण्यात आली. परंतु त्यातील 12 जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेती आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री गस्तीवर असताना वणी पोलिसांना माहिती मिळाली की, नागपूर येथून एक आदिलाबाद येथे जनावरांना वाहून नेत आहे. माहिती मिळताच वणी पोलिस ठाणेदार वैभव जाधव यांच्या टिमने मुकुटबन टी पॉईंट जवळ नाकाबंदी केली. इथे वाहनांची तपासणी सुरू केली. रविवारी पहाटे 2.45 वाजता एक ट्रक भरधाव वेगाने पोलिसांच्या दिशेने येत असल्याचे दिसले. माहितीप्रमाणे हा तोच ट्रक होता. उभ्या असलेल्या पोलिसांनी त्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा ट्रक तिथून सुसाट वेगाने न थांबता निघून गेला.
पोलिसांनी त्वरित ट्रकचा पाठलाग सुरू केला. ट्रकला पकडण्यात आले. चालकाला विचारणा केली असता सदर वाहन हे नागपूर येथील असून हा ट्रक आदीलाबाद येथे जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले. ट्रक मध्ये बघितले असता त्यात एकूण 38 बैल दिसून आले. या जनावरांच्या कोणत्याही खान्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यातच या जनावरांना दोराने अत्यंत क्रूरपणे बांधण्यात आले होते.
यातील जनावरांची तपासणी केली असता त्यातील 26 जनावरे हालचाल करीत होती तर 12 जनावरे बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तपासणी केली असता या 12 जनावरांचा मृत्यू झाला. या कार्यवाहीत 26 बैल ज्यांची किंमत 20 हजार प्रत्येकी नुसार 5 लाख 20 हजार तर या गुन्ह्यात उपयोगात आणणारे वाहन ह्याची किंमत 6.7 लाख रुपये असा एकूण 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाईत शितालसिंग रामलखनसिंग राठोड (35) रा. नागपूर, शेख साबीर शेख साबीर मोहमद (25) रा. नागपूर, अब्दुल रशीद (36) रा. नागपूर, जाकीर पोसवाल (38) रा. पांढरकवडा, शेख आरिफ कुरेशी (40) रा. उमरी यांच्यावर कलम प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नुसार कलम 11, 11(1) (झ), 11 (1) (ड), महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम नुसार कलम 6, भारतीय दंड संहिता 1860 नुसार 279, 429, 34 मुंबई पोलीस अधिनियम नुसार 119, मोटार वाहन अधिनियम नुसार 179(1), 179 (2), 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. का. जगदीश बोरणारे करीत आहे.