शेतकऱ्यांच्या नावाने बोगस दाखले देऊन जनावर तस्करी

बाजार ठेकेदार, ग्रामपंचायत व नगपालिकेचा प्रताप

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली, अनंतपूर मार्ग जनावर कत्तलीकरिता तेलंगणात दिवस रात्र चारचाकी व पायदळ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष असून सदर तस्करीतून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव वणी जत्रेतील बैल बाजार, कायर येथील बैलबाजार, तसेच वरोरा, कळंब, राळेगाव येथून लाखो रुपयांची गाय व बैल खरेदी करून कायर ते गणेशपूर, अडेगाव, खातेरा मार्ग शेकडो जनावरे बेला तेलंगणात पायदळ जनावर तस्करी होत आहे.

या तस्करीत बेला येथील ८ ते ९ जनावर तस्कर असून यांची पोलिसांशी मधुर संबंध ठेऊन महिन्याकाठी ५० हजार मिळत असल्याची माहिती आहे. तर चारचाकी पिकअप व छोटा हत्ती नामक गाडीमध्ये भरून गाय बैल निमनी ते अडकोली अर्धवन भेंडाळा ते मांगली वरून माता मंदिर मार्ग पैनगंगा नदीच्या तीरावर नेऊन सोडणे तसेच याच परिसरातील जनावर तस्कर जनावरे पायदळ दिवसरात्र घेऊन असे जातात जसेकी ते शेतकरी आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावर तस्करी सुरू असून पोलिसांकडून साधी कार्यवाही नसल्याने संशय व्यक्त केल्या जात आहे.

मारेगाव ते रोहपट मार्गाने निमनी मार्ग जंगलातून पायदळ गारगोटी पोड पर्यंत दररोज शेकडो जनावरे पायदळ जातात. तर वणी येथून चारचाकीने वरील मांगली व माथार्जुन मार्ग अनंतपुर मार्ग तेलंगणात गाय, बैल व म्हशी मोठ्या प्रमाणात कत्तली करीता जनावर तस्करी सुरू आहे. तस्करीत बोरी, झरी, मारेगाव, वरोरा, कळंब, राळेगाव, वणी, मुकुटबन येथील तस्कर असून तस्करांबाबत पोलिसांना माहिती असून कोणतीही कार्यवाही नाही.

जनावर पायदळ तस्करी करीता एका व्यक्तीला एका बैल जोडीचे १५०० रुपये दिल्या जात असल्याने तरुण मुल या तस्करी करिता पुढे येताना दिसत आहे. जनावर तस्करांना बैल बाजार ठेकेदार, ग्रामपंचायत व नगरपरिषद यांची साथ असल्याचे दिसत आहे. कारण यापूर्वी काही तरुणांनी तस्कराणा पायदळ घेऊन जाणारे जनावरांसह तस्करांना पकडण्यात आले होते परंतु तस्करांनी जनावरे खरेदी केल्याचे दाखले पोलिसांना दाखवून जनावरे सोडून नेले.

या बाबत पोलिसांना विचारणा केली असता दाखले असल्यामुळे आम्हाला कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याचे सांगितले.परंतु एक शेतकरी किती वेळा जनावरे विकतो किंवा विकत घेतो कारण या मार्गावरील तस्कर व शेतकरी दररोज एकच दिसतो ज्यामुळे दाखले देणारे व जनावर तस्कर याची मोठी मिलीभगत असून या जनावर तस्करीला सर्वच जवाबदार असल्याचे दिसत आहे.

जनावर तस्करांनी पाटण व मुकुटबन येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांना पकडून लाखोंची उलाढाल करून जनावर तस्करीला मदत करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. कार्यवाही करणारेच तस्करांशी हात मिळवून काम करीत असेल तर जनावर तस्करी बंद कशी होणार असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या बैल बाजारातून जनावर तस्कर दाखले घेतात तेथील ग्रामपंचायत, ठेकेदार व नगरपरिषद ची कसून चौकशी केल्यास बोगस दाखल्याची सत्यता बाहेर येईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.