विवेक पिदूरकर, शिरपूर: आज गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी मेंढोली येथे लिम्पी त्वचा रोगाबाबत मार्गदर्शन व लसीकरण शिबिर घेण्यात आले. हे शिबिर पशुवैद्यकीय दवाखाना शिरपूर अंतर्गत डॉ. धीरज अनिल सोनटक्के व पशुधन विकास अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. यावेळी सुमारे 500 जनावरांना रोगापासून बचाव करण्यासाठी लस देण्यात आली.
शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरात शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या पाळीव गुरांना लिम्पी या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. हळूहळू या रोगाची व्याप्ती तालुक्यातील अनेक गावांत वाढत आहे. ऐन खरीप हंगामात जनावरे आजारी पडत आहे. तसेच आजार वाढून काही जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. या रोगाचे वाढते थैमान लक्षात घेऊन मेंढोली येथे लिम्पी स्किन डिजीस मार्गदर्शन व लसीकरण घेण्यात आले. सकाळी 8 वाजता या शिबिराला सुरुवात झाली.
गोठ्याची स्वच्छता व वेळीच औषधोपचार करणे गरजेचे: डॉ. सोनटक्के
हा रोग एक विषाणूजन्य रोग असून मुखत्वे माश्या, गोचीड इ प्रकारच्या किटकांपासून होतो. जनावरांना रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून नियमीत गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे. गोठ्यात सूर्यप्रकाश आला पाहिजे म्हणजे गोठ्यात माश्या मझर होणार नाही इ काळजी शेतक-यांनी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. धीरज सोनटक्के, पशूवैद्यकीय अधिकारी शिरपूर
संसर्ग न होण्यासाठी काय घ्यावी काळजी?
आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे, आजारी जनावरांना चराई करण्यास न सोडता घरीच ठेवावे. शक्यतो मुबलक हिरवा चारा खाण्यास द्यावा. जनावर आजारी झाल्यास लवकरात लवकर औषध उपचार केल्यास हा रोग नियंत्रणात येतो. तसेच शेतकऱ्याने घाबरून जाऊ नये.
या शिबिरात सरपंच पवन एकरे व उपसरपंच दिनेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील प्रमुख मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होती.
काय असतात या रोगाचे लक्षणं?
हा आजार गोचीड, माशा आदी चावणाऱ्या किटकांपासून पसरतो. हा रोग मार्च ते सप्टेंबर पर्यंत अधिक प्रमाणात असतो. संसर्गजन्य रोग असून जनावरांना तीव्र स्वरूपात ताप येतो. आजारी जनावरे चारापाणी घेणे बंद करतात. त्यामुळे जनावरे अशक्त होतात. खांद्यावर, पायावर सूज येते. तर काही जनावरांच्या अंगावर गाठी येऊन फुटतात. सदर रोगात लाल रक्तपेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. त्यामुळे जनावरे ८ ते १० दिवसात दगावतात.