वणी उपविभागाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले
वणीत संध्याकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची माहिती
जितेंद्र कोठारी, वणी: वणी आणि परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. तसेच काही ठिकाणी गारपिट झाल्याचीही माहिती आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अचानक आलेल्या पावसामुळे थंडीत वाढ झाली आहे.
हवामान खात्याने सोमवारी दोन तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. वणीत मंगळवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपार पर्यंत वातावरण सर्वसामान्य होतं. मात्र 4.30 वाजताच्या सुमारास वातावरण ढगाळ झालं. संध्याकाळी 7 ते 7.30 वाजताच्या सुमारास जोरदार वादळ सुरू झाले व धुवांधार पावसाला सुरूवात झाली. काही काळ अवकाश घेऊन हा पाऊस मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता.
काही काळ वणी शहर अंधारात
नेमके दिवे लागणीच्या वेळीच पाऊस सुरू झाला. वादळी वा-यासह पाऊस असल्याने शहराचा वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी काही काळ संपूर्ण वणी शहर अंधारात गेले होते. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने विजेचा खेळखंडोबाही रात्रभर सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती.
अनेक ठिकाणी गारपिट, शेतीचे नुकसान
वणी उपविभागात जवळपास सर्वत्रच हा पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपिट झाले. त्यामुळे रस्त्यावर व शेतात गारांचा ढिग गोळा झाला. मारेगाव तालुक्यातील कुंभा येधे मोठ्या प्रमाणात गारपिट झाले. गारपिटीमुळे गहू आणि तुरीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले याची अद्याप माहिती हाती आलेली नाही.
सावधान ! आणखी दोन दिवस पावसाचा इशारा
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी आणि गुरुवारी देखील वादळी वा-यासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.