गाडी चालविणा-या व कापूस वेचणा-या हातांनी घडविली बँक अधिकारी

वणीतील सेवानगरमधली हर्षाली झाली बँक अधिकारी

0

निकेश जिलठे, वणी: तिचे वडील साधे वाहन चालक तर आई शेतात कापूस वेचते. बहिणीचं शिक्षण व्हावं या साठी भावासह सर्वांची धडपड सुरू होती. ती अभ्यासात प्रचंड हुषार, परिश्रमाची प्रचंड तयारी. उपलब्ध साधनांची कमतरता कधी कधी तिच्या आड यायची. मात्र तरीरी न खचता तिच्या डोळ्यातली चमक एका भव्य यशाच्या शोधात होती. तिच्यातला आत्मविश्वास आणि काहीतरी करण्याची धडपड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. एकदा मामाने तिला मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले आणि तिने काय केलं की ज्यामुळे तिचं भविष्यच बदललं. शिकण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य वाटणारे स्वप्न ही पूर्ण केली जाऊ शकते. याच आदर्श ठेवला वणीतील एका तरुणीने. हा रोमहर्षक आणि प्रेरणादायी प्रवास आहे कु. हर्षाली कुईटेचा. गरीबी आणि विविध अडचणींवर मात करून हर्षालीची निवड बँकेत अधिकारी म्हणून झाली आहे.

हर्षाली वणीतील मोक्षधाम रोड सेवानगर येथील रहिवाशी आहे. तिचे वडील प्रकाश कुईटे हे व्यवसायाने वाहन चालक. सध्या ते वणी जवळील राजूर येथील इशान गोल्ड या कंपनीत वाहन चालकाचे काम करतात. घरची परिस्थिती आधीपासूनच बेताची. मात्र मुलीची शिकण्याची जिद्द बघून त्यांनी तिला शिकवण्याचा निश्चय केला. मुलीच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी त्यांनी ओव्हर टाईम केला. तर आई सुनिता कुईटे यांनी इतरांच्या शेतावर मजुरी केली. मात्र मुलीला शिकवले. भाऊ विनम्र हा लोटी महाविद्यालयात बी कॉम करतोय. त्यानेही बहिणीला शिक्षणासाठी अडचण येऊ नये म्हणून शिकत असतानाच छोटी मोठी नोकरी करून हातभार लावला. अखेर गेल्या आठवड्यात बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकारी या पदाचा निकाल आला. त्यात हर्षांलीचे नाव बघून केवळ कुटुंबीयच नाही तर परिसरातील लोकांच्या आनंदाला सीमा उरली नाही.

केवळ खासगी शाळा याच यशाचे मार्ग असते ही सर्वसामान्यांची कल्पना हर्षालीने खोडून काढली. हर्षालीचे प्राथमिक शिक्षण नगर पालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये झाले. त्यानंतर पाचव्या वर्गात तिने एसपीएम शाळेत ऍडमिशन घेतली. त्याच वेळी तिने नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली. त्यात तिला यश मिळाले व तिला बेलोरा (घाटंजी) येथील शाळेत प्रवेश मिळाला. शालेय जीवनातच हर्षालीच्या अभ्यासाची चुणूक दिसत होती. दहावी तिने 85 टक्के घेऊन उत्तिर्ण केली. तर 12 वी 74 टक्के घेऊन. त्यानंतर तिने नागपूर येथील कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर येथून बीएस्सी (कृषी) केले. हे करतानाच तिच्या मनात स्पर्धा परीक्षेचा विचार घोळत होता. त्यासाठी तिने एमपीएसस्सी ऐवजी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केले.

मोबाईल की शिक्षण ?
कॉलेजमध्ये क्लासमेंटच्या हातातील भारी भारी मोबाईल पाहून हर्षाली विचलीत झाली नाही. स्मार्टफोन तर सोडा तिच्याकडे साधा मोबाईलही नव्हता. मोबाईल घ्यावा अशी आर्थिक परिस्थितीही नव्हती. त्यातच तिचे मामा विनोद वैरागडे यांनी तिला मोबाईल घेण्यासाठी दहा हजार रुपये दिले. मात्र हर्षालीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. तिने कुणालाही न सांगता मोबाईल विकत घेण्या ऐवजी चंदिगढ येथील एका संस्थेचा ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला. हाच क्लास तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.

या पहिल्या क्लासमुळे हर्षालीच्या मनात स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. तिने स्पर्धा परीक्षा हेच ध्येय पुढे ठेवले. त्यानंतर तिने नागपूर येथे बँकिंग परीक्षेचा क्लास लावला. त्यात तिला यश आले. डिसेंबर महिन्यात तिची निवड सारस्वत बँकेमध्ये सहायक अधिकारी म्हणून निवड झाली. सध्या ती नागपूर येथील अजनी शाखेत कार्यरत आहे. दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकारी या पदाच्या जागा निघाल्या. त्यात तिने अप्लाय केले व त्यात तिने यश मिळवले. तिची कृषी अधिकारी या पदासाठी निवड झाली. हर्षालीचे मामा विनोद वैरागडे चंद्रपूर येथील एका शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षणासाठी हर्षांलीला कधीही कमी पडू दिले नाही. अडिअडचणीत ते हर्षालीच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले व आजही खंबीरपणे पाठीशी उभे राहतात.

मुलगी शिकली प्रगती झाली…
हर्षालीची आई सुनिता कुईटे सांगतात की हर्षालीला लहाणपणापासूनच अभ्यासात हुषार होती. जेव्हा तिचा नवोदय मध्ये नंबर लागला तेव्हा मुलीला शिकण्यासाठी घराबाहेर पाठवण्याला माझा विरोध होता. समाज काय म्हणेल, एकट्या मुलीला घराबाहेर कसे पाठवायचे याची चिंता सतवायची. मात्र हर्षालीच्या मामाने माझी समजूत काढली. पुढे तिला शिकण्यासाठी तिच्या बाबाने आणि मी कधीही कमतरता भासू दिली नाही. तिचे बाबा ओव्हर टाईम करायचे तर मी शेतात मजुरीला जायचे. आज जेव्हा तिला मिळालेलं यश बघितल्यावर आम्ही तिच्यासाठी जे कष्ट घेतलं त्याची चिज झाल्याचं समाधान वाटते. आधी मुलीला शिकवायचं नंतर ती तिच्या भावाला शिकवेल असं आधीच ठरल्याचंही त्या सांगतात. 

 

जिद्द आणि चिकाटी हेच स्वप्न पूर्ण करतात: हर्षाली
फ्लॅशबॅकमध्ये जाताना हर्षालीचे डोळे पाणावतात. आई वडिलांचे कष्ट, आर्थिक मदत व्हावी यासाठी भाऊ विनम्र याने नोकरी करणे. मामांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आणि मदत इत्यादी गोष्टी आठवून ती भावूक होते. ती म्हणते की जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करणे अशक्य नाही. परिस्थिती नसेल तरीही तुमच्यातील जिद्द बघून तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठीशी उभे राहताते. तुमच्यासाठी हवे ते कष्ट घेतात. शिक्षण हे सर्वच समस्येवर उपाय ठरतो. जर आधीपासून तुम्ही योग्य ते परिश्रम घेतले तर यश मिळवणे फारसे कठिण नसते. 

प्रतिकुल परिस्थित हर्षालीने यश गाठले आहे. तिचे हे यश वणी आणि परिसरातील परिश्रम घेणा-या विद्यार्थ्यांना प्रेरणादाई ठरत आहे. केवळ कृषी अधिकारी नाही तर नाबार्ड हे अंतिम ध्येय असल्याचे हर्षालीने सांगितले. धनंजय आंबटकर, दिलिप पडोळे, रमेश येरणे, बंडू पोटदुखे, प्राचार्य सौ. बांगडे इत्यादींनी तिच्या या यशाचे कौतुक करत तिचा सत्कार केला. जिद्द, चिकाटीला परिश्रमाची जोड असली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच हर्षालीच्या कहाणीतून दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.