प्रचाराच्या रणधुमाळीत राजकारण्यांनी चिन्हेच बदलवली

'कमळ' आणि 'पंजा'च्या ऐवजी 'दूध' आणि 'दारू'ची बाटली

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: मागील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ‘कोठे चालला देश?’ आणि ‘कोठे चालला महाराष्ट्र?’ या दोन राजकीय घोषवाक्यांनी गाजली होती. परतु 11 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मात्र ‘कोणाला मते देणार?’ – ‘दुधाला की दारूला?’ इतक्या हीन पातळीवर आली आहे. त्यामुळेच आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विवेकशील मतदार प्रश्न विचारीत आहेत – ‘कोठे चालली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक?’ निवडणुकीच्या प्रचारात कमळाला ‘दूध’ आणि पंजाला ‘दारू’ असे प्रतिशब्द निर्माण करण्यात आले आहेत.

या लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांचा कोणे एके काळी दुधाचा व्यवसाय होता; आणि काँग्रेसचे उमेदवार बाळूभाऊ धानोरकर यांचा अधिकृतपणे नोंदणीकृत असा दारूचा व्यवसाय आहे. या दोनही उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या पहिल्या चार दिवसांत या दोघांच्याही व्यवसायाची जनमानसात कुठेही चर्चा नव्हती.

परंतु नंतर मात्र भाजपच्या एका सभेत व्यवसायावरून या दोन उमेदवारांची ओळख करून देण्यात आली; आणि नंतर निवडणुकीचा प्रचार ‘दुधवाला की दारूवाला?’ या दोन शब्दांभोवतीच फिरायला लागली. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची दिशाच दिशाहिन झाली. ‘हा दूधवाला की दारूवाला’ फिव्हर इतका वेगाने राजकारण्यांच्या तोंडी पसरला की मुख्यमंत्र्यांसारख्या संयमी नेत्याने सुद्धा थेट लोकांना प्रश्न विचारला ”तुम्हाला दूधवाला खासदार पाहिजे की दारूवाला?”

याला सोशल मीडियानेसुद्धा उमेदवारांची ही व्यवसायाची बाब ‘कॅच’ करून आपापल्या परिने राजकीय प्रचार अधिकच गढूळ करण्यास हातभार लावला. यामुळे या दोन उमेदवारांच्या आपापल्या कारकिर्दीतील विकासात्मक भूमिकेची आणि कार्याची तौलनिक वास्तविकता बाजूला पडून आता संपूर्ण प्रचार या दोन पेया भोवतीच फिरत आहेत.

आता या मतदारसंघातील जागरुक आणि विवेकशील मतदार एकमेकांना विचारत आहे की निवडणूक आयोगाने या दोन उमेदवारांची अधिकृत चिन्हे कधी बदलवली? निवडणुकीच्या प्रचारसभेत नेत्यांकडून केवळ विकास, ध्येय व धोरणे यावर बोलणे अपेक्षीत असताना आता व्यवसायावरून भावनात्मक आभासी मुद्दे तयार केले जात आहे व राजकीय हवा तापवत ठेवण्यावर भर दिला जात आहे. राजकारण्यांची ही प्रचाराची शैली आणि त-हा अशीच कायम राहिली तर आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रचार अधिकच व्यक्तीगत आणि खासगी जीवनाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या पातळीवर आला, तर आश्चर्य वाटायला नको !!

Leave A Reply

Your email address will not be published.