वणीत दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाचे तांडव, जनजीवन विस्कळीत
चिखलगाव येथे वीज कोसळून 3 महिला किरकोळ जखमी... सोयाबीन व कापूस पिकाला अतोनात नुकसानीचा अंदाज...
जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरात आज सोमवारी दुपारी 3 वाजता सुमारास परतीच्या पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. वणी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. आज दुपारपासून देखील ढगाळ वातावरण होते. अशातच 3.15 च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक तास पडलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तर वणीलगत असलेल्या चिखलगाव येथील एका शेतात वीज कोसळली. यात शेतात काम करणा-या 3 महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान संध्याकाळी वृत्त लिहे पर्यंत शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती.
सध्या दिवाळीनिमित्त वणीची बाजारपेठ फुलली आहे. दुपारी ऊन पडले होते. त्यामुळे पावसाचा अंदाज नसल्याने अनेक लोक छत्री, रेनकोट न घेता बाहेर पडले होते. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक येथे रस्त्याच्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती व पूजा साहित्य विक्रेत्यांनी दुकाने लावली आहे. मात्र 3 वाजताच्या सुमारास अचानक पाऊस झाल्याने रस्त्यावरच्या विक्रेत्यांना पळापळ करावी लागली. तसेच त्याचवेळी अनेक शाळा सुटल्याने मुलांची पळापळ झाली होती.
मान्सून परतीच्या वाटेवर असताना आलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांना प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या जवळपास सोयाबीन व कापूस बाजारात विक्रीसाठी येतात. मात्र यंदा सततच्या पावसामुळे कापूस वेचणी उशीर झाली आहे. सोयाबीन कापून शेतकऱ्यांच्या शेतात ठेवून आहे. अशातच आजच्या पावसामुळे शेतात उभ्या व कापून ठेवलेल्या पिकांना जोरदार फटका बसल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.