उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का

अखेर उपचाराविनाच गमवावा लागला महिलेला जीव

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पाश्वभूमिवर एक संतापजनक घटना वणीत घडली आहे. एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना वणीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांनी प्रकृती बघुन तात्काळ पुढच्या उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यासाठीचे पत्र देऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार तर सोडा त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारला गेला. एक तर ग्रामीण रुग्णालयात उपचार तर मिळाले नाही. उलट शिक्का मारल्याने त्यांना इतर खासगी रुग्णालयातही उपचार करता आले नाही. अखेर कोरोनाच्या दहशतीखालीच या महिलेची प्राणज्योत मालवली. जर वेळीच उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता. केवळ ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या महिलेची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सविस्तर वृत्त असे की आशा बुधाजी काळे (43) या वेकोलि वणी नार्थमध्ये सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. त्या वणीतील पटवारी कॉलोनी येथील रहिवाशी होत्या. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या होती. 29 एप्रिलला त्यांना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तत्काळ वणीतील सु्गम हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले. तेथे त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांना न्युमोनिया सदृश लक्षणं दिसत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील वेकोलिच्या हॉस्लिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र खासगी ऍम्बुलन्सने रुग्णाला हलवता येत नसल्याने त्यांना तत्काळ वणी येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यास सांगितले. हॉस्पिटलने वैद्यकीय अधिक्षकांच्या नावाने तसे प­त्र ही दिले.

महिलेच्या नातेवाईकांनी ताबडतोब ग्रामीण रूग्णालय गाठले. तिथे त्यांची तपासणी होईल अशी आशा होती. मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांची साधी तपासणी करण्याचे सौजन्य ही दाखवले नाही. उलट ड्युटीवर असलेल्या डॉ. महेंद्र सुलभेवार यांनी त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.

प्रातिनिधिक फोटो

आता मात्र काळे यांचे कुटुबातील व्यक्ती पुरते खचले होते. त्यांना पुढील उपचाराची गरज असताना त्यांची कोणतीही तपासणी न करता उलट त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का ही बसला. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आता कोरोनाच्या धाकात जगत होते. हातावर शिक्का बसल्याने त्यांचे इतर खासगी रुग्णालयाचे दरवाजेही बंद झाले होते. हा संपूर्ण काळ त्यांचा कोरोनाच्या दहशतीखाली गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. अखेर आजारी असतानाही योग्य ते उपचार न मिळाल्याने 1 मेला आशाबाईंची प्रकृती अधिकच खालावली.

प्रकृती खालावल्याने तिच्या कुटुंबियांनी त्यांना पुन्हा सु्गम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. मात्र तो पर्यंत त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देउन त्यांना पुन्हा ताबडतोब चंद्रपूरला रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र यासाठी सरकारी एम्बुलन्सची गरज असल्याने त्यांनी रुग्णाला पुन्हा ग्रामीण रूग्णालयात रेफर केले.

येथेही पुन्हा ग्रामीण रूग्णालयाचा भोंगळ कारभार पाहावयास मिळाला. तिथे पेशंटला आत ही न घेता हलगर्जीपणा दाखवीत परस्पर त्यांच्या एम्बुलेंसमधून चंद्रपुरला पाठविले. ज्यावेळी त्यांना पाठवण्यात आले त्यावेळी ऍम्बुलन्समध्ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होता. अखेर अर्ध्या रस्त्यातच आशाबाईंची प्राणज्योत मालवली. चंद्रपूरला पाहोचताच डॉक्टरांनी आशाबाईंना मृत घोषीत केले.

महिलेची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह

नातेवाईकांनी मृतदेह लगेच ताब्यात घेऊन परत निघतो, अशी भूमिका घेतली. मात्र रुग्णालय प्रशासन कडक भूमिका घेत शवविच्छेदनावर ठाम राहिले. डॉक्टरांनी त्यांना समजावले की या महिलेची कोरोना तपासणी आणि शवविच्छेदन गरजेचे आहे. तोवर मृतदेह ताब्यात देता येणार नाही. तब्बल 24 तासांहून अधिक काळ मृतदेह रुग्णालयात राहिला. ती कोरोनाबाधित नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला.

मुली झाल्या पोरक्या…

आशाबाईंच्या पश्चात त्यांना तीन मुली आहेत. यातील एका मुलीचे लग्न झाले आहे. आधीच या मुलींचे वडिलांचे छत्र हरवले होते. त्यांच्या एकाएकी जाण्याने आता दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत. कोवळ्या वयातच वडिलांची साथ सुटल्यानंतर आता त्यांच्या आईचीही साथ सुटली. ग्रामीण रूग्णालयाच्या हलगर्जीपणाने या दोन मुलीवर आज ही पाळी आल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.

या सर्व प्रकारास ग्रामीण रुग्णालय हलगर्जी कारभार जबाबदार आहे. त्यांनी जर वेळीच तपासणी करून होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारला नसता तर त्यांना वेळीच चंद्रपूरला उपचार मिळाले असते. शिवाय त्यांना कोरोनाच्या धाकात जगावेही लागले नसते. ग्रामीण रुग्णालयाने हयगय केल्यामुळेच त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली. असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून ग्रामीण रूगणालयातील दोषी अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी काळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

या निमित्ताने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे
या निमीत्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबातील कोणी सदस्य गेल्या काही दिवसांत परदेशातून प्रवास करून आला असेल किंवा कोरोनाबाधित शहरातून आला असेल तर त्यांच्यावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारला जातो. पण इथे तसा काही प्रकार नसताना शिक्का का मारण्यात आला? होम क्वारंटाईन केल्यावर दुस-या दिवशी प्रकृतीची तपासणी करणे गरजेचे असताना तपासणी का केली गेली नाही? शिक्का मारल्यानंतर डॉक्टरांची जबाबदारी संपते का? 108 सेवेतील एम्बुलन्सवर पेशंट सोबत डॉक्टर देणे आवश्यक नाही का? कोरोना सारख्या महामारीत एम्बुलन्समध्ये पुरेसा ऑक्सीजन व इतर आवश्यक सोयी अदयावत असणे गरजेचे नाही का? अशा प्रकरणात वैदयकीय अधिक्षकांनी 24 तास सजग असणे आवश्यक नाही का? कोणताही कोरोनाबाधित शहराची हिस्ट्री नसताना होम कॉरेन्टाईनचा शिक्का बसल्याने रुग्णामध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल याची जाणीव डॉक्टरांना नव्हती का? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित केले जात आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.