शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण
भजनाच्या माध्यमातून मांडले शेतक-यांचे प्रश्न.... अनेक नेत्यांनी दिली उपोषण मंडपास भेट
भास्कर राऊत, मारेगाव: शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. आज भजनाच्या माध्यमातून शेतक-यांच्या विविध मागण्या करीत जनतेचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान तालुका आणि जिल्हास्तरावरील अनेक राजकीय पुढारींनी उपोषण मंडपास भेट देत उपोषणाला पाठिंबा दर्शवला.
शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचे शेतीसाठीचे वीजबिल माफ करण्यात यावे, तालुक्यातील नवीन रस्त्यांचे बांधकाम योग्य रितीने करावे, 2022-23 करिता शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा मंजूर करून रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, वर्धा नदीकाठावरील पूर बाधित शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर 50 हजार अनुदान त्वरित जमा करण्यात यावे, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान तसेच वाघाच्या दहशतीचा त्वरित बंदोबस्त करणे, कापसाला 12 हजार 500 व सोयाबीनला 8 हजार 500 हमीभाव देण्यात यावा अशा विविध मागण्या काँग्रेस करत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
या मागण्यांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार, काँग्रेस सेवादलाचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल विखणकर, माजी पंचायत समिती अध्यक्ष अरविंद वखनोर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माणिक पांगुळ यांनी दि. 1 डिसेंबर पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली.
आज शुक्रवारी दिनांक 2 डिसेंबर रोजी उपोषणाचा दुसरा दिवस होता. यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनिष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नरेंद्र ठाकरे, माजी जि. प. सभापती अरुणा खंडाळकर तसेच अनेक नेत्यांनी या उपोषण मंडपास भेटी देत आपला पाठिंबा जाहीर केला.
हे देखील वाचा:
Comments are closed.