पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली

झरी तालुक्यात मटकाचालकासोबत कथित ऑडिओ क्लिप व्हायरल.... पाटण येथे कारवाईचा वणी पॅटर्न?

जितेंद्र कोठारी, वणी:  परिसरात एक दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटण पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगिता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांना तात्काळ नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी बाभूळगाव येथील सपोनि संदीप पाटील हे पाटण येथे ठाणेदार म्हणून रुजू झाले आहे. मात्र एसपी यांची ऑर्डर येतात संगीता हेलोंडे या मेडिकल रजेवर गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात एका महिला पोलीस अधिका-याची एका मटकेवाल्यासोबत संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सदर क्लिपमध्ये एक महिला पोलीस अधिकारी संध्याकाळपर्यंत हप्ता पोहोचव, 15 दिवसात मटका चालवायची परवानगी देते अशा आषयाचे संभाषण त्या क्लिपमध्ये होते. कथित क्लिपमधला आवाज महिला पोलीस अधिका-याचा असल्याची चर्चा केवळ झरी तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती. यामुळे एकच खळबळ उडाली शिवाय पोलीस विभागाच्या अब्रुचे धिंडवडेही निघाले होते. 

स्पोर्ट बाईकवरून ठाण्यात एन्ट्री घेणे… उडाणटप्पू, रोड रोमियोंची भर चौकात धुलाई करणे… चिडीमार, टवाळखोर यांच्यावर वचक ठेवणे, अवैध धंदेवाल्यांच्या  मुसक्या आवळणे अशा अनेक कार्यवाहीमुळे संगीता हेलोंडे या चर्चेत आल्या होत्या. सुरुवातीला त्या वणी पोलीस ठाण्या पोलीस उप निरीक्षक म्हणून कर्तव्यावर होत्या. त्यानंतर त्यांना बढती मिळून त्या सपोनि म्हणून पांढरकवडा येथे रुजू झाल्या होत्या. तिथे लॉकडाऊनचा काळ त्यांनी चांगलाच गाजवला. नियम न पाळणा-यांवर केलेल्या कार्यवाहीमुळे परिसरात अल्पावधीतच त्या ‘लेडी सिंघम’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. या भागातील अनेक अवैध धंदेही त्यांनी तात्काळ बंद केले होते. त्याचे बक्षिस म्हणून त्यांना पाटण पोलीस ठाण्याचा ठाणेदार म्हणून प्रभार देण्यात आला. 

पाटण हे तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील पोलीस स्टेशन आहे. अवैध दारू, गुटखा तस्करी, सुगंधी तंबाकू, गोतस्करी, गांजा, अंमली पदार्थ इत्यादी अवैध व्यवहार सीमावर्ती भागातून होतो. त्यामुळे आडमार्गावर असणा-या पाटण पोलीस स्टेशनचे एक वेगळे महत्व तर आहेच, शिवाय मलईदार ठाणे म्हणूनही या ठाण्याची ओळख आहे. हेलोंडे यांची पांढरकवडा येथून पाटण येथे बदली करण्यात आली होती. एक सिंघम अधिकारी पाटण आल्याने अनेक अपेक्षा हेलोंडे यांच्याकडून व्यक्त केल्या जात होत्या. सुरुवातीला पाटण परिसरातील चिडीमारी करणा-या तरुणांवर त्यांनी कार्यवाही केली. त्यानंतर त्यांनी काही अवैध व्यावसायिकांवरही कार्यवाहीचा धडाका लावला होता. मात्र काही दिवसांतच ही कार्यवाही थांबून पाटण पोलीस स्टेशनमध्ये सर्व सुरळीत सुरू झाले.

काय होते त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये?
पेट्रोलिंग दरम्यान महिला अधिका-याची एका मटक्याच्या धंद्यात असलेल्या व्यक्तीशी गाठ पडते. महिला अधिकारी त्याला जुना हिशेब बाकी असल्याचे सांगून संध्याकाळपर्यंत वाटा (हप्ता) पोहोचता करण्याची मागणी करते. त्यावर ती व्यक्ती सध्या धंदा बंद असल्याचे सांगते. त्यावर ती महिला अधिकारी कोण काय करते हे सर्व माहिती असून 15 दिवसात मटक्याची परवानगी देते, मात्र आधी वाटा पोहोचव असे सांगते.

कथित व्हायरल ऑडिओ क्लिपची चर्चा
काही दिवसांआधी संगीता हेलोंडे यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून एका वृत्तपत्रातर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवसांनी एका महिला अधिका-याची एका मटका व्यावसायिकाला हप्ता मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. कथित क्लिप मधला आवाज हा पाटण येथील महिला अधिका-याचा असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. मात्र ही क्लिप बनावट असल्याचा दावा महिला अधिका-यानी करत हा आरोप फेटाळला होता. दरम्यान काहींनी ही क्लिप वरिष्ठ अधिका-यांपर्यंत पोहोचवली. या प्रकरणी महिला अधिका-याची एसपी समोर पेशी देखील झाल्याचीही माहिती आहे.

पाटण येथे कारवाईचा वणी पॅटर्न?
वणीतील सातत्याने वाढणा-या घरफोडी, दुचाकीचोरी व सुरू असलेले अवैध धंदे यावर अंकुश न ठेवता आल्याच्या अनेक तक्रारी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्याबाबत होत्या. त्यातच एसपी हे वणीत आल्यानंतर परिसरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टरने ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप थेट एसपी समोर केल्यानंतर वणीतील ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना मेडिकल रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा प्रभार एपीआय माया चाटसे यांच्याकडे देण्यात आला होता. सध्या संगिता हेलांडे या देखील मेडिकल रजेवर गेल्याची माहिती आहे. आधी वणी पोलीस स्टेशनध्ये आणि आता पाटण पोलीस स्टेशनमध्ये असा वसुलीचा आरोप होत समोर आल्याने वणी उपविभागातील पोलीस विभागाची अब्रु वेशीवर टांगली जात आहे.

दरम्यान जी कथित क्लिप व्हायरल झाली होती. त्याची सत्यता तपासणे गरजेचे असून सत्य समोर यायला हवे, अशी अपेक्षा केली जात आहे.  

 

Comments are closed.