थरार: पतीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला

वरोरा रोडवर सकाळी घडला थरार, आरोपी पती फरार... सहकारी महिलेचे धाडस, अन् पत्नीचा वाचला जीव

विवेक तोटेवार, वणी: कौटुंबीक वादातून पतीने आपल्या पत्नीवर भर रहदारीच्या रस्त्यावर चाकूहल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मुलासमोरच पतीने हा जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी पती अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सविस्तर वृत्त असे की आरोपी दिवाकर राजगडकर (45) हा मुळचा मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील रहिवासी असून तो एसटी महामंडळात चालक या पदावर कार्यरत आहे. काही वर्षांआधी त्याचे वणीतील विठ्ठलवाडीतील येथील अर्चना मडावी (40) हिच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी देखील आहे. पतीच्या दारू पिऊन मारहाण करण्यामुळे व संशयी वृत्तीमुळे त्यांच्यात वाद व्हायचे. सततच्या वादाला कंटाळून अर्चना ही काही महिन्याआधी वणी येथे माहेरी तिच्या मुलीला घेऊन परत आली. तर मुलगा हा पतीसोबत राहतो. उदरनिर्वाहासाठी अर्चना ही एका खासगी शिक्षण संस्थेत काम करते.

आज गुरुवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ती तिच्या काही महिला सहका-यासोबत कामाला जात होती. दत्तमंदिरजवळ सहकार महिलांसह गाडीची वाट पाहत असताना तिचा पती दिवाकर याने तिला गाठले. तिथे दिवाकरने त्याच्या पत्नीसोबत वाद घातला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात अर्चनाच्या हात, मांडी व कंबरेवर मार लागला आहे. विशेष म्हणजे चाकूहल्ला करताना पतीने त्याच्या मुलालाही सोबत आणले होते. त्याच्यासमोरच हा थरार घडला.

सहकारी महिलेच्या धाडसाने वाचला जीव… 
पती दिवाकरच्या अंगात सैतान संचारला होता. त्याने पत्नीवर चाकूने वार करायला सुरुवात केली. मात्र त्याच वेळी अर्चनासोबत असलेल्या सहका-यातील एक महिला सहकारी धाडस दाखवत पुढे आली. तिने अर्चनाच्या पतीची कॉलर पकडून त्याला तिथून दूर केले व खाली पाडून हल्लेखोराचा हल्ला रोखला. दरम्यान तिथे इतर लोकही गोळा झाले. ही सहकारी महिला जर सोबत नसती तर कदाचित अर्चनाचा जीवही गेला असता. अर्चनाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहे.

आरोपीवर भादंविच्या 307 नुसार गुन्हा का नाही?
आरोपी पती हा कायमच त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. पत्नी माहेरी गेल्यावर तिथे येऊनही त्याचे घरी येऊन वाद घालणे सुरू असायचे. काही दिवसांआधी आरोपी पती व त्याच्या चुलत भावाने पीडितेला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत पीडितेने 25 ऑक्टोबर 2022 रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. शिवाय आरोपीने एकदा न्यायालयाच्या आवारात पत्नीला मारहाण केल्याची माहिती आहे. आज देखील आरोपीने जीव घेण्याच्या उद्देशाने पत्नीवर चाकूने हल्ला केला. मात्र पीडितेची सहकारी महिलेने धाडस करून रोखल्याने पतीचा जीवे मारण्याचा डाव फसला. एवढे असूनही पोलिसांनी भादंविच्या 307 ही कलम गाळून 324 नुसार गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरोपीवर कलम भादंविच्या कलम 324 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सुदर्शन वानोळे हे करीत आहे.

हे देखील वाचा: 

आता 3D मध्ये आनंद घेता येणार अवतार 2 सिनेमाचा, रोज 2 शो 3D मध्ये

Comments are closed.