जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविली जात आहे. मात्र वणी शहरात कोरोना सोबतच अवैध धंद्याचा संसर्गही वाढल्याचे चित्र दिसत आहे. संध्याकाळी 5 नंतर लॉकडाऊन लागताच अवैध दारू विक्रीला चांगलीच तेजी येत आहे. याशिवाय मटकापट्टी लावण्यासाठीही चांगलीच गर्दी जमत असल्याचे चित्र सध्या वणीत दिसत आहे. त्यामुळे लॉकडाउनचे नियम केवळ दुकानदार, फळभाजी विक्रेते, चाय टपरी व सर्वसामान्य नागरिकांकरिता लागू आहे का ? असा संतप्त सवाल वणीकर जनता करीत आहे. दरम्यान संध्याकाळी 5 नंतर शास्त्रीनगर चौकात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा व्हिडीओ ‘वणी बहुगुणी’च्या हाती आला आहे.
सायंकाळी 5 वाजेनंतर दुकाने बंद करण्यासाठी शहरभर गस्त घालणाऱ्या पथकाला मटका व दारु अड्ड्यांवर असलेली माणसांची गर्दी दिसत नाही का ? हे पथकालाच माहीत. पोलीस स्टेशन पासून अगदी 200 मीटर अंतरावर मटकापट्टी व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे. तर शहरातील शास्त्रीनगर, रंगनाथ नगर, वागदरा, दामले फेल भागात सकाळी पासून अवैध दारुची विक्री होत असल्याची माहिती आहे. अवैध दारु विक्रीच्या धंद्यात महिलांचाही समावेश असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे अवैध व्यवसायाच्या ठिकाणी मास्क व सोशल डिस्टनसिंगचे अजिबात पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्यास अवैध व्यावसायिकसुद्दा जवाबदार आहे. लॉकडाउन नियमानुसार देशी दारु दुकाने व बार सायंकाळी पाच नंतर बंद करणे गरजेचे आहे. मात्र बार व देशी दारु दुकानदार शटर बंद धंदा सुरु नियम पाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. अवैध दारु विक्री रोखण्याकरिता वणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग पूर्णपणे कुचकामी ठरत आहे. अबकारी अधिकारी दारु माफियांच्या दावणीला बांधले गेल्याचे आरोपही होत आहे.
शास्त्रीनगर चौकात खुलेआम दारू विक्री
शहरातील शास्त्रीनगर चौकात संध्याकाळी 5 नंतर दारुची अवैधरित्या विक्री जोमात सुरू आहे. संध्याकाळी 5 नंतर बार व वाईन शॉप बंद होत असल्याने तळीरामांचा मोर्चा अवैध दारुविक्री होत असलेल्या अड्यावर निघतो. राजरोसपणे सुरु असलेल्या या दारूविक्रीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र भीतीपोटी हे नागरिक अधिकृतरित्या तक्रार करण्यास धजावत नाही. याबाबतचा व्हिडीयो देखील ‘वणी बहुगुणी’च्या हाती आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे अवैध धंदे बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही शहरात राजरोसपणे मटकापट्टी आणि अवैध दारूविक्री सुरू आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीयो…
हे देखील वाचा: