जखमी गायी प्रकरणी तात्काळ चौकशी करा, युवासेनेची मागणी

शहरात अफवांना उत, वेद्यकीय उपचार करण्याची गरज

0

जब्बार चीनी, वणी: शहरात काही गायी जखमी अवस्थेत फिरत आहेत. त्याबाबत शहरात विविध तर्क वितर्क लावले जात आहे. कुणी ऍसिड हल्ला, तर कुणी उकळते पाणी फेकल्याने तर काहींनी आजारांमुळे जखम झाल्याचा दावा केला आहे. जखमी गायी अद्यापही शहरात मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर योग्य तो उपचार झालेला नाही. त्या जखमी का झाल्या आहेत, याचे कारण शोधून त्यांच्यावर योग्य तो वैद्यकीय उपचार करावा यासाठी युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

शहरात अनेक लोक गायी पाळतात. काही गो पालकांचे दुर्लक्ष असल्याने त्यांची जनावरे शहरात मोकाट फिरतात. गेल्या काही दिवसांपासून शहरात 3-4 गायी जखमी अवस्थेत काहींना आढळून आल्यात. त्यांच्या पाठीवर गंभीर जखमा आहेत. या जखमा कशामुळे झाल्यात हे अद्याप कळलेले नाही. पण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या जखमा चिघळत आहेत. शिवाय कोरोनासारख्या महामारीच्या काळात जखमा अंगावर घेऊन फिरणे हे अधिक धोकादायक आहे.

जखमा मानवनिर्मित की आजाराने याचा शोध घ्या – विक्रांत चचडा
मुक्या जनावरांनी जखमा शरीरावर घेऊन फिरणे ही गोष्ट मानवतेला कलंक लावणारी आहे. सध्या जखमी गायींवर कुणीतरी घरगुती तात्पुरता इलाज करीत आहे. दुर्लक्ष झाल्याने जखमा चिघळत आहेत. त्यामुळे या गायींवर पशू वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. तसेच जखमांबाबत अनेक अफवा पसरत आहे. त्यामुळे या जखमा कशामुळे झाल्या याचाही शोध पशू वैद्यकीय अधिका-यांनी घेणे गरजेचे आहे. जर या जखमा मानवनिर्मित असेल तर आरोपीनंवर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे.
– विक्रांत चचडा, जिल्हाध्यक्ष युवासेना

निवेदन देताना विक्रांत चचडा, हिमांशू बतरा वणी विधान सभा चिटणीस, अनुप चटप उप तालुका प्रमुख, शुभम मदान युवा सैनिक, बंटी येरणे शहर युवा अधिकारी, सौरभ खडसे उप शहर अधिकारी, कुणाल लोणारे शहर संघटक, निलेश चिंचोलकर यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते. सध्या या प्रकरणी प्रशासनाने पावले उचलून कार्यवाही सुरू केल्याची माहिती युवासेने तर्फे देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.