फेसबुकवरून प्रेम, तरुणी घरून पळून निघाली थेट जम्मूला

वाटेत रेल्वे पोलिसांनी जोडप्याला घेतले ताब्यात, तरुणी वणीला परत....

0

विवेक तोटेवार, वणी: त्या तरुणीची फेसबुकवर एका तरुणाशी ओळख झाली. दोघांनी प्रेमाच्या आनाभाका घेतल्या. तरुण जम्मूचा तर तरुणी तालुक्यातीलच एका खेडेगावातील. अखेर प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने घरून पळून थेट जम्मूला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र रेल्वेत असताना या जोडप्यावर एका सुज्ञ व्यक्तीची नजर गेली आणि रेल्वे पोलिसांनी त्या जोडप्याला वाटेतच ताब्यात घेतले. ही कहाणी एका चित्रपटातील वाटत असली असली तरी ही चित्रपटातील कहाणी नसून प्रत्यक्षात घडलेली आहे व आपल्याच तालुक्यातीलच आहे.

बुधवारी दुपारी अचानक वणी पोलीस स्टेशनच्या टेलिफोनची रिंग खणखणली. तिथे असणा-या पोलिसांनी फोन उचलताच समोरून लुधियाना पोलीस बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सुरूवातीला अचानक इतक्या दूरून कॉल का केला याबाबत त्यांना कुतुहल वाटले. मात्र नंतर त्यांनी वणीतील मुलगी त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्या कर्मचा-याने त्वरित याबाबत कॅबिनमध्ये जाऊन ठाणेदार वैभव जाधव यांना माहिती दिली. त्यांच्या लगेच हा प्रकार लक्षात आला. कारण एक दोन दिवस आधीच पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंगची तक्रार करण्यात आली होती.  तरीही ती तरुणी तिथे गेली कशी हे एक कोडेच होते. मात्र लुधियाना येथे वणी पोलीस गेले व मुलीला ताब्यात घेतल्यावर सर्व चित्रच स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका खेडेगावात राहणारी नम्रता (बदललेले नाव) ही वणीतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षणाच्या निमित्ताने ती वणीत रूम करून राहायची. दरम्यान 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ती घरातून निघून गेल्याचे तिच्या कुटुंबीयांना लक्षात आले. त्यावरून त्यांनी त्वरित 28 जुलै रोजी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. 29 जुलै रोजी लुधियाना रेल्वे पोलिसांनी वणी पोलिसांशी संपर्क साधून कॉलेज तरुणी लुधियाना येथे असल्याची माहिती दिली व त्यांनी त्वरित घेऊन जाण्याबाबत सांगितले. ठाणेदारांनी त्वरित निर्णय घेत नापोका गजानन होडगीर व पोलीस शिपाई अविनाश खाडे यांना लुधियानाला रवाना केले. दुस-या दिवशी ते लुधियाना येथे पोहोचले. त्यांनी त्वरित तरुणीला ताब्यात घेतले व तिथून ते वणीसाठी निघाले. आज शनिवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी पोलिसांची टीम मुलीला घेऊन वणीला आली व त्यांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. मात्र नम्रता अचानक तिथे गेलीच कशी हा प्रश्न अनुत्तरीतच होता.

मिळालेल्या माहितीनुसार, वणीत राहत असताना नम्रताची फेसबुकवरून एका तरुणाशी ओळख झाली. तो तरुण मुंबईला नोकरी करायचा. लवकरच त्या दोघांची फैसबुकवरची ओळख मैत्रीत बदलली व पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. जम्मूला जाऊन लग्न करण्याचे त्यांचे ठरले. ठऱल्याप्रमाने नम्रता ही जम्मूला जाण्यासाठी निघाली. आधी ती वणीवरून नागपूरला गेली. लॉकडाऊऩ असल्याने ती लिफ्ट मागून नागपूरला गेल्याचे समजते. तर प्रियकर हासुद्धा मुंबईवरून नागपूर येथे आला. तिथे दोघांची भेट झाली. त्यानंतर ते दोघेही नागपूरवरून रेल्वेनी प्रवास करीत दिल्लीला आले.

दिल्लीवरून त्या दोघांचा जम्मूला जायचे होते. त्यानुसार ते दोघेही जम्मू तावी या एक्सप्रेसमध्ये बसले व जम्मूसाठी रवाना झाले. दरम्यान गाडीत बसल्यावर गाडीतील काही सुज्ञ लोकांच्या व्यक्तींचा या दोघांवर संशय आला. त्यांनी त्यांना विचारणा केल्यावर त्यांना मुलीला फूस लावून महाराष्ट्रातून आणल्याचे कळले. त्यांनी त्वरित याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी लुधियाना आल्यावर त्या दोघांना लुधियाना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. लुधियाना रेल्वे पोलिसांनी वणी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

सोशल मीडियावर व्हिडीयो व्हायरल
हे दोघे पळून गेल्यावर रेल्वेमध्ये एका व्यक्तींचा जेव्हा या जोडप्याबाबत संशय आला तेव्हा त्यांनी याबाबत त्यांना विचारणा करीत याचा व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओत त्याने संपूर्ण कहाणी सांगून मुलीला तिच्या पालकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले होते. हा व्हिडीओ सध्या वणीत चागंलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून परिसरात चर्चेला चांगलेच उधाण आले होते.

मुलगा कोण? व ते जम्मूला कशासाठी चालले होते?
या जोडप्याला पोलिसांनी तक्रार केल्यावर वणीतून पोलीस लुधियानासाठी निघाले. तिथे पोहोचल्यावर मुलीने तिची मुलाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुलाला सोडून दिले. मुलाबाबत वणी पोलीस स्टेशनलाही कोणतीही अधिकची माहिती नाही. त्यामुळे तो तरुण कोण आहे, तो तिला कसा भेटला, जम्मूत ते कुठे चालले होते,  मुलाचा बॅकग्राउंड काय आहे. इत्यादी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

या घटनेमुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. आधीच वणीत शास्त्रीनगर येथील 3 बेपत्ता मुलीचे प्रकरण गाजत असतानाच त्याच  दरम्यान हे नविन प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र या  प्रकरणात मुलावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने या प्रकरणाला इथेच पूर्णविराम मिळाला. तरीही या प्रकरणामुळे परिसरात विविध तर्क वितर्क व शंका कुशंका उपस्थित होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!