गो ग्रीन क्लबतर्फे वृक्षारोपण व ग्रंथायलाचे उद्घाटन सोहळा
क्रांतिदिनी मारेगाव येथे संजय चचाने यांचे कौतुकास्पद कार्य
नागेश रायपुरे, मारेगाव: क्रांतिदिन व जागतिक आदिवासीदिनी गो ग्रीन क्लबचे अध्यक्ष संजय चचाने यांच्या पुढाकारात वृक्षारोपण झाले. कुरेशी ले आउटयेथील देवस्थान परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा झाला. तसेच सुसज्ज अशा स्पर्धापरीक्षा ग्रंथालयाचे उद्घाटन अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले.
“आवड असली की सवड मिळतेच आणि इच्छा असली की मार्ग सापडतोच.” या सुभाषिताची प्रचिती संजय चचाने यांच्या संकल्पनेतून साकार झाली. नव्या जनरेशनच्या हितासाठी गो ग्रीन क्लबद्वारा स्पर्धापरीक्षा ग्रंथालय उद्घाटन सोहळा झाला. संजय चचाने यांच्या घरीच हे ग्रंथालय सुरू झाले. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रकाश कोरान्ने तर अध्यक्ष म्हणून श्रीधर भरणे लाभलेत. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र साखरकर, कुर्ले, पैकूजी अत्राम, ज्योती साखरकर, सुरेखा चचाणे, हर्षदा चोपणे (कुरले), मत्ते हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आदरणीय संजय चचाने सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागते ही भावना सतत मनात ठेऊन नवीन काहीतरी समाजोपयोगी कार्य करीत राहणं, हा जणू त्यांचा एक छंदच झाला आहे. त्यांनी ग्रंथालयासाठी आपले अगदी नवीन घर उपलब्ध करून दिले. त्याच प्रमाणे ज्योती साखरकर आणि राजेंद्र साखरकर यांनी पुस्तके तथा 5000 रुपयाचा चेक देऊन दातृत्व दाखविले. असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढलेत.
या प्रसंगी हर्षदा चोपणे, ज्योती साखरकर, प्रकाश कोरान्ने, श्रीधर भरणे सर यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे संचालन गजानन तुरारे यांनी केले, आभार महेश लिपटे यांनी मानलेत.