अस्पृश्यता संपविण्याचा मार्ग म्हणजे वाचनालय: प्रा. राजूरकर

मारेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन

भास्कर राऊत, मारेगाव: वाचनालय हे अस्पृश्यता संपविण्याचा मार्ग आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता असते. पुस्तक वाचल्यावर मेंदू घडतो. मन आणि मस्तक सुधारण्यासाठी पुस्तक महत्वाची भूमिका बजावत असतात. आजपर्यंत उच्च वर्णीयांचेच अनेक ठिकाणी वर्चस्व राहिलेले आहे. आता तुकड्यावर जगणे सोडा. पुस्तक हे स्वाभिमानाने जगायचे कसे हे शिकविते. असे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. मारेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

वाचनालयाचे उद्घाटन विचारवंत अभ्यासक अशोक राणा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की मोबाईल क्रांतीमुळे माणसे दुरावली आहेत. आणि हा दुरावा कमी करण्याचे साधन म्हणजे वाचनालय होय. राजकारण्यांच्या मागे न धावता युवकांनी आपले लक्ष वाचन आणि भविष्यावर केंद्रित केले पाहिजे असे वक्तव्य केले.

यावेळी मारेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रदीप रामटेके यांनी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच वाचनालयाला 5 हजार एक रुपये देणगी जाहीर केली. सोबतच प्रदीप बोनगीरवार यांनीही 5 हजार रुपये देणगी आणि जागा बघितल्यास पुन्हा आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मोहन हरडे यांनीही 5 हजाराची देणगी दिली.

ढवस, मंगेश गवळी, अशोक राणा, विठ्ठलराव शंभरकर, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट जळका या सर्वांनी पुस्तके भेट दिली. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष सौ.इंदूताई किन्हेकर, माजी पं. स. सभापती सौ. शकुंतला वैद्य, अनंतराव मांडवकर, राजेश पोटे, बिहाडे सर,पंडिले सर, मोहन हरडे, प्रदीप बोनगीरवार, ढवस सर, मंगेश गवळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढवस यांनी केले. संचालन लीलाधर चौधरी यांनी, तर आभार हेमराज कळंबे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर रसिक वर्गाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वाचनालयाच्या सर्व संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.