जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी संपूर्ण दिवस वैद्यकीय प्रमाणपत्र काढणा-या मजुरांच्या नशिबी केवळ अवहेलनाच आली. आधी दुपारी 3 पर्यंत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र ग्रामीण रुग्णालयात मजुरांची एकच झुंबड उडाली. त्यामुळे दुपारी 3 नंतर हे प्रमाणपत्र कोविड 19 समितीमार्फत शेतकरी मंदिरात वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र तिथे पुरेशी व्यवस्था नसल्याने तिथेही मजुरांचे हालच झाले.
आधी मजुरांनी भर उन्हात ग्रामीण रुग्णालयात रांग लावली. त्यानंतर त्या सर्व मजुरांना शेतकरी मंदिरात जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र तिथे कोणतीही पुरेशी व्यवस्था नव्हती. तपासणीसाठी आलेले अधिकारी व कर्मचारी यांना तपासणीचे कसलेही साहित्य दिले नव्हते. डॉक्टरांकडे कोणतेही साहित्य नसल्याने त्यांना केवळ आधार कार्ड बघून प्रमाणपत्र देणे भाग पडले.
पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही…
कडक उन्ह लक्षात घेऊन वैद्यकीय अधीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तिथे धड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली नव्हती. अखेर प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या मजुरांनी स्वखर्चाने कॅन बोलवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
दिवसभरात केवळ बिस्किटाचा आधार
रात्री 11 पर्यंत प्रमाणपत्र वाटपाचे कार्य सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. अनेक मजूर सकाळी 9 वाजेपासून तिथे आलेले होते. त्यांचा ना ग्रामीण रुग्णालयात नंबर लागला, ना शेतकरीमंदिरात. तिथे त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही कुणी केलेली नव्हती. मजुरांसोबत आलेले छोटे मुलं उपाशी झोपी गेले. अखेर रात्री उशिरा वणीतील साहित्य वाटप करणा-या व्यक्तीला शेतकरी मंदिरात मजूर उपाशी असल्याची माहिती. त्यानंतर त्यांनी तिथे जाऊन मजुरांना खाण्यासाठी बिस्किट दिले. त्यामुळे त्यांच्या पोटाला थोडा तरी आधार मिळाला. तिथे वैद्यकीय चमू दुपारी 3 पासून होती. मात्र तिथे त्यांच्याही साध्या चहापाण्याची व्यवस्था केली गेली नव्हती.
केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्याबाबत लिस्ट तयार केली गेली. तसेच त्यांच्यासाठी पासची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी वैद्यकीयदृष्या फिट असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. त्यामुळे घरी जाण्याची ओढ लागलेले मजूर सध्या वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
या प्रकरणात केवळ मजुरांचीच नाही तर कर्मचा-यांचीही अवहेलना होत आहे. रुग्णांना तपासणीचे साहित्यही अद्याप दिले गेले नाही. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत रुग्णांना तपासावे तरी कसे हा प्रश्न डॉक्टरांना पडत आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे आरोग्याबाबत चाललेला गोंधळ बघता या विषयात जिल्हाधिका-यांनी लक्ष देऊन होणारी अवहेलना थांबवण्याची गरज आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…
हे पण वाचा – धक्कादायक… तपासणी न करताच मजुरांना मेडिकल सर्टिफिकेट