मारेगावात ‘पव्वा’ व ‘टील्लू’ चढ्या दरात, गोरगरिबांच्या खिशाला चोट
संतापलेल्या मद्यपींचा एल्गार, थेट वरिष्ठांंकडे तक्रार
भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाचा आलेख कमी होत चालला तरी काही क्षेत्रामध्ये अजूनही महागाईच्या नावाखाली जनतेची लूट मात्र थांबलेली नाही. पेट्रोल, गैस, खाद्यतेल आदींसह अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशातच मारेगावात नियम धाब्यावर ठेवून देशी दारूची जादा दराने विक्री केल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील मद्यपी संतापले आहेत. रोजची सुरू असलेल्या या खिसेकापूविरोधात मद्यपींनी एल्गार पुकारला असून याबाबत त्यांनी थेट वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे. संपूर्ण कोरोनाकाळात राजरोसपणे दारू व्यावसायिकांनी गोरगरीब ग्राहकांची लूट केली. मात्र आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा सवाल मद्यपींद्वारा उपस्थित केला जात आहे.
स्वस्त म्हणून मोठ्या प्रमाणात देशी दारू सेवन केले जाते. कष्टकरी जनतेचा या दारूकडे अधिक कल असतो. त्यामुळे तर काही लोकांचे भोजना पेक्षा दारुवर जास्त प्रेम असल्याचे बघायला मिळते. वेगवेगळ्या नावाने ही देशी दारु मद्यपींमध्ये लोकप्रिय आहे. देशी दारु मध्ये सर्वाधिक खप 180 एम.एल.चा “पव्वा” व टिल्लू नावाने ओळखल्या जाणाऱ्या 90 एम.एल च्या दारुचा आहे.
सामान्याच्या आवाक्यात देशी दारुचे दर राहावे म्हणून देशी दारुवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे यावर नियत्रंण असते. दारुचे दर निश्चीत असून ठरवून दिलेल्या रकमेलाच तिची विक्री व्हायला पाहिजे हे बॉटलवर लिहीलले असते. असे असताना लॉक डाऊनच्या काळा पासून मारेगावात दारु दुकान चालका कडून दारुच्या छापील किंमती पेक्षा जास्त दराने दारु विक्री करुन आर्थिक लुट करीत असल्याची लेखी तक्रार नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.
या बाबत दुकानदार चालकाला विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असा आरोप ही तक्रारितून करण्यात आला आहे. काही वर्षांआधी वणी येथेल सर्व वाईन शॉपमध्ये सामुहिक रित्या चढ्या दरात विक्री केली जात होती. याबाबत एका व्यक्तीने तक्रार केली होती. अखेर वणी येथे सुरू असलेली आर्थिक लूट थांबली. मारेगाव येथेही अशीच चढ्या दराने विक्री सुरू आहे. आता यावर काय कार्यवाही होते या कडे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा:
मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार