युवासेनेने रंगवले शहरातील खड्डे, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी अनोखा उपक्रम

पावसाळ्याआधी खड्डे बुजवले नाही तर सेनेस्टाईल समस्या सोडवू, युवासेनेचा इशारा

0

विवेक तोटेवार, वणी: शहरात ओव्हरलोड ट्रक व रस्त्यावर पडलेले खड्डे नगरपालिकेला दाखवण्यासाठी व त्या खड्यामुळे अपघात होऊ नये यासाठी युवासेनेतर्फे अनोखे खड्डे रंगवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्लीतील रस्त्यावरील खड्डे पेन्टने रंगवण्यात आले. याशिवाय पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर खड्डे बुजवावे व ओव्हरलोड वाहतुकीला लगाम लावावा यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी व तहसीलदार यांना युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. निकृष्ठ बांधकाम व रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शहरात केवळ मुख्यरस्त्यावरच नाही तर गल्लीतही खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे लोकांना त्रास होत आहे. लवकरच पावसाळा सुरू होईल जर पावसाळ्याच्या आधी जर हे खड्डे बुजले गेले नाही तर अपघाताची शक्यता बळावू शकते त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वणीत खड्डे रंगवा उपक्रम
ओव्हरलोड वाहतुकीमुळे तसेच नगर पालिकेतर्फे रस्त्यांची योग्य ती देखभाल होत नसल्याने खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वणीत दोन दिवसांआधी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात खड्डे रंगवा उपक्रम राबवला. त्याद्वारे शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि गल्लीतील खड्डे रंगवण्यात आले.

नगरपालिकेचे डोळे उघडण्यासाठी उपक्रम: विक्रांत चचडा
शहरातील अंधभक्त विकास विकास करीत राहतात. हे करीत असताना त्यांना शहरातील समस्या मात्र दिसत नाही. त्यामुळे सत्ताधा-यांनी केलेला विकास दाखवण्यासाठी आम्ही खड्डे रंगवण्याचा उपक्रम राबवला. शहरात इतके खड्डे आहेत की खड्डे रंगवताना आमच्या जवळील पेन्ट संपला पण खड्डे संपले नाही. या प्रकरणी याआधीही आम्ही नगरपालिकेकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले अखेर झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठीच आम्ही खड्डे रंगवले. जर पावसाळ्याआधी प्रशासनाने खड्डे बुजवले नाही तर सेने स्टाईल ही समस्या सोडवू – विक्रांत चचडा, जिल्हाध्यक्ष युवासेना

पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजवावे तसेच शहरातील ओव्हरलोड वाहतूक बंद करावी अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी विक्रांत चचडासह, बंटी येरणे शहर प्रमुख, कुणाल लोणारे शहर संघटक, सौरभ खडसे, अनुप चटप, ललित जुनेजा, राकेश नगरकर, निलेश कराबुजे व युवासेनेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.