वणीत ‘खाया लगाया’ची धूम, तरुणाई सट्टेबाजीच्या दलदलीत…

रोज कोट्यवधींची उलाढाल, प्रशासनाचे सट्टेबाजीकडे दुर्लक्ष....

0

विवेक तोटेवार, वणी: आयपीएल येताच शहरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास एका दिवशी एका कोटीपेक्षा अधिक रुपयांची यात उलाढाल होते. यावरून याची व्याप्ती तर लक्षात येते शिवाय यात किती लोक गुंतले आहे याचाही यातून प्रत्यय येतो. अनेक प्रतिष्ठीत लोक यात बरबाद झाले आहेत तर काही शहरातील प्रतिष्ठीत लोकही बुकी बनत या व्यवसायात उतरले आहे. सर्वच वयोगटातील लोक यात आहेत मात्र तरुणाई याच्या आहारी गेली आहे. यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचाही समावेश आहे. कोट्यवधींची उलाढाल होत असताना तसेच अनेक लोक देशोधडीला लागले असतानाही यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश नाही. शहरात रोज सट्टा जोमात सुरू असूनही अद्याप एकही कार्यवाही झालेली नाही हे विशेष.

सट्टा ज्याला बेटिंग देखील म्हटले जाते. भारतात बेटिंगवर कायदेशीररित्या बंदी आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकारच अवैध असतो. आधी ही बेटिंग ऑफलाईन असायची. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता हा ऑफलाईन सोबत ऑनलाईनही खेळला जातो. अद्याप ऑनलाईनशी सट्टेबाज तेवढे जुळले नसल्याने सध्या ऑफलाईन बेटिंगलाच सट्टेबाजांची अधिक पसंती आहे.

केवळ आयपीएलवरच बेटिंग होते का? तर नाही. सर्वच खेळावर बेटिंगची करता येते. पण आयपीएल यात सर्वात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आयपीएलची वाट केवळ बुकीच नाही तर सट्टे लावणारेही बघत असतात. भारतात बेटिंग बेकायदेशीर असल्याने हा खेळ सर्व कोडिंगमध्ये चालतो. शिवाय यात काही तांत्रिक बाबी आहेत त्या कळणे देखील महत्त्वाचे आहे.

ज्या व्यक्तीकडे सट्टा लावला जातो त्याला बुकी म्हणतात. तर सट्टा लावणा-याला पंटर म्हटले जाते. बेटिंग (सट्टा) मध्ये दोन शब्द अतिशय महत्वाचे आहे. एक  म्हणजे खाई आणि दुसरा लगाई. यावरच पूर्ण हा खेळ चालतो.

1 ऑक्टोबरला आयपीएलची किंग एलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन यांच्यात मॅच आहे. बेटिंग एक दिवस आधीच खुली केली जाते. यात ज्या टीमचे पारडे जड आहे ती टीम फेव्हरेट जाहीर केली जाते. या मॅचसाठी मुंबई इंडियन ही टीम फेव्हरेट जाहीर झाली आहे. जी टीम फेव्हरेट असते (जिंकण्याची शक्यता अधिक असेत) त्याचा दर कमी असतो. तर जिंकण्याची शक्यता कमी असते त्याचा दर जास्त असतो. 1 ऑक्टोबरच्या मॅचसाठी 74-76 पैसे असा दर जाहीर करण्यात आला आहे.

खाई लगाई किंवा खाया लगाया म्हणजे काय?
फेव्हरेट टीमवर पैसे लावण्याला लगाई म्हणतात तर विरुद्ध टीमवर पैसे लावण्याला खाई म्हटले जाते. मुंबई इंडियन ही टीम फेव्हरेट आहे. जर त्यावर एखाद्या सट्टेबाजाला पैसे लावायचे असल्यास तो मुंबई इंडियन XYZ रुपये लगाया म्हणत सट्टा लावेल. जर सट्टेबाजाला किंग इलेव्हन पंजाबवर पैसे लावायचे असल्यास तो मुंबई इंडियन XYZ रुपये खाया म्हणत सट्टा लावेल.

मुंबई इंडियन विरुद्ध किंग इलेव्हन पंजाब मॅचचा दर 74-76 पैसे आहे. जर सट्टेबाजाने मुंबई इंडियनवर 10 हजार लावायचे असल्यास तो 10 हजार लगाया म्हणत सट्टा लावेल. मुंबई इंडियन जिंकली तर त्याला 10 हजारांवर 7400 रुपये मिळेल आणि हरली तर त्याचे 10 हजार रुपये जाईल. जर त्याला किंग इलेव्हन पंजाबवर 7600 रुपये लावायचे आहे तर तो मुंबई इंडियन 7600 रुपये खाया म्हणत पैसे लावेल. यात किंग इलेव्हन पंजाब जिंकली तर त्याला 7600 वर 10 हजार रुपये मिळेल आणि हरली तर त्याचे 7600 रुपये जाईल.

प्रातिनिधिक फोटो

सट्टा केवळ मॅच कोण जिंकणार यावरच लावला जात नाही तर क्रिकेटमधल्या प्रत्येक गोष्टींवर होतो. मॅचमध्ये कोण खेळणार? टॉस कोण जिंकणार? किती ओव्हरमध्ये किती रन निघणार अशा अनेक गोष्टी वर सट्टा लावला जातो. पण महत्त्वाची दोन बेटिंग आहे. एक म्हणजे कोणती टीम जिंकणार व दुसरा किती ओव्हरमध्ये किती रन्स निघणार. या दुस-या प्रकाराला सेशन सट्टा म्हटले जाते.

बेटिंगचे नेटवर्क कसे असते? कोण जाहीर करतो दर ?
काही देशामध्ये बेटिंग लिगल आहे. त्यामुळे तिथून ही सर्व बेटिंग मॅनेज केली जाते. मुख्य बुकी हा टीमचा दर तसेच फेव्हरेट टिम जाहीर करतो. मुख्य बुकीच्या खाली मुंबई, नागपूर, वणी अशी बुकीची चैन खाली उतरते. वणीतही बुकींची संख्या मोठी आहे. महत्त्वाचे म्हणजे काही प्रतिष्ठीत व्यक्तीही बेटिंगच्या धंद्यात बुकी म्हणून उतरले आहे. यात प्रतिष्ठीत व्यावसायिकासह एका डॉक्टरचाही समावेश आहे.

क्रमश:

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.