अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यंदाचे जैताई मातृगौरव पुरस्काराचे मानकरी 

शंकर धोबी ते डॉ.शंकरबाबा पापळकर पर्यंतच्या जीवन प्रवासाला मानवंदना

 

जितेंद्र कोठारी, वणी : बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड बनून भरीव असे समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची यावर्षी जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कारादाखल एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ प्रदान करण्याचा निर्णय जैताई देवस्थान समितीने घेतला आहे. शंकरबाबा पापळकर यांंची जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी ‌सर्वानुमते निवड केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.    

वणी येथील जैताई माता मंदिरात दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना जैताई मातृ गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. आता पर्यंत निस्वार्थ समाजसेवेला समर्पित 12 भगिनींना जैताई मातृगौरव हा प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराच्या तपपूर्ती निमित्त जैताई देवस्थान समितीने अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना यंदाचे जैताई मातृगौरव पुरस्काराने गौरविण्याचा एकमुखाने निर्णय घेतला.

शंकरबाबा पापळकर यांनी वझ्झर (अचलपूर) येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह (अनाथालय) च्या माध्यमातून 123 अनाथ दिव्यांग मुलांचे मातृपितृत्व स्वीकारले आहे. दहावी नापास शंकर धोबी ते डॉ. शंकरबाबा पापळकर या भारावून टाकणाऱ्या जीवन प्रवासाला मानवंदना देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतेच डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.    

गुरुवार 19 ऑक्टो. रोजी जैताई सभागृहात आयोजित कार्यक्रमात 91 वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक यांचे हस्ते शंकरबाबांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार ते स्वतः न स्वीकारता त्यांची लता मंगेशकर गायन पुरस्कार प्राप्त अंध मानसकन्या गांधारी हीच्या हस्ते स्वीकारणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार उपस्थित राहणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.