वणीत जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा

मोमिनपुरा, पंचशील नगर, काजीपुरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये जश्न ए ईद मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त 18, 19 व 20 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. शहरातील मोमिनपुरा, पंचशील नगर, काजीपुरा येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. परचम कुशाही, लंगर, कुराण पठण तसेच चिमुकल्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शरबत व मिठाई वाटपही करण्यात आली. टिळक चौकामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.

Podar School 2025

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस हा ईद मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो. वणीतही या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त 18 ऑक्टोबरला मोमिनपुरा येथे महिलांद्वारा कुरान पठण करण्यात आले. 19 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजता लंगर ए आम (महाप्रसाद) याचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी मुलांसाठी तकरीर आणि नात (धार्मिक गीत) यांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानंतर 250 मुलांना टिफिनचे वाटप करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पंचशील नगरमध्ये मंगळवारी दुपारी 2.30 वाजता व रात्री 7 वाजता लंगरचे आयोजन करण्यात आले होते. तर मदिना मस्जिद काजीपुरा येथे सकाळी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ईद मिलादुन्नबी निमित्त मोमिनपुरा व पंचशील नगर हा परिसर झेंडे, तोरण, पताका आणि रोषणाईने सजवण्यात आला होता. मोमिनपु-यात भारत माता चौक ते अब्दुल हमिद चौक पर्यंत रोषणाई करण्यात आली होती. तर पंचशील नगर येथे साई नगरी के पंचशील नगर या परिसरात रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान सर्वसामान्यांसाठी मिठाई  व शरबत वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला.

टिळक चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन
दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 150 लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी केले. या कार्यक्रमाला ठाणेदार शाम सोनटक्के व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली. नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँकेच्या सहकार्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला. जमात ए इस्लामी हिंद तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैयद जफर, सैयद सलीम कादरी, सैयद वसीम कादरी, मोहम्मद अनवर हयाती, अब्दुल जफर, मोहसिन रजा यांच्यासह जश्न ए ईद मिलादुन्नबी कमिटीचे सदस्य तसेच रक्तदान शिबिरासाठी जमात ए इस्लामी हिंदच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.