वणीकरांसाठी ‘वरदान’ ठरणार जुनाडा ओव्हरब्रीज

वणी-भद्रावती अंतर 16 किलोमीटर करणा-या पुलाचे काम अंतिम टप्यात

0

जितेंद्र कोठारी, वणी:  वणीहून भद्रावती जायचं म्हटलं की बस जवळपास 1 ते दिड तास घेते. दुचाकीनेही जायचे म्हटले तरी 1 तास कुठेही गेला नाही. मात्र वणीहून आता अवघ्या 15 मिनिटात भद्रावती पोहोचू शकणार असं म्हटलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे 100 टक्के खरे आहे व अवघ्या काही दिवसांमध्येच हे प्रत्यक्षात उतरणार आहे. ही किमया साधणारी गोष्ट म्हणजे जुनाडा ओव्हरब्रीज. या ब्रीजमुळे वणी ते भद्रावती अंतर अवघे 16 किलोमीटरचे होणार आहे. निळापुर मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर ओव्हर ब्रिजचे काम आता अंतिम टप्यात सुरू आहे. हा नवीव शॉर्टकट वणी तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे.

जुनाडा ते तेलवासा दरम्यान 22 कोटीच्या निधीतून तब्बल 250 मीटर लांबीच्या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. रहदारी करिता या पुलाचा वापर लवकरात लवकर करण्यात येणार आहे. या नव्या शॉर्टकट रस्त्यामुळे बाजारपेठ आणि व्यापार याला चालणा मिळणार आहे. याशिवाय भद्रावती हे एक पौराणिक शहर आहे. अनेक पुरातन सर्वधर्मिक वास्तू इथे आहेत. त्यामुळे अध्यात्मिक दृष्ट्यादेखील याचे महत्त्व आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी ही मोठी आणि महत्वाची बाजारपेठ आहे. जिल्ह्यातील नव्हे तर चंद्रपूर जिल्हा व तेलंगणा राज्यातील ग्राहक व शेतकरी विविध मालाच्या व शेतमालाच्या खरेदी विक्री करिता येतात. जुनाडा ओव्हरब्रिजमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 100 ते 125 गावे वणी बाजारपेठेला जुळणार आहे. त्यामुळे वणी येथील जिनिंग उद्योगसह धान्य खरेदी-विक्री, कृषी केंद्र, किराणा, हार्डवेअर, कापड, सराफा, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक व्यवसायांना याचा फायदा होणार आहे.

अवघ्या एक ते दीड महिन्याची प्रतिक्षा: बांधकाम विभाग
यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या या महत्वाच्या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. 250 मीटर लांबीपैकी तब्बल 200 मीटर बांधकाम पूर्ण झाले आहे. जून 2021 या महिन्या अखेर पुलाचे बांधकाम पूर्ण करणे आमचे लक्ष्य आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच रहदरीकरिता सुरु करण्यात येईल. जुनाडा पूल हा वणी व भद्रावती शहराच्या विकासासाठी महत्वाचा बिंदू ठरणार आहे.
:टी. व्ही. हंडराले, उपविभागीय अभियंता सा.बा. विभाग भद्रावती

पुलासाठी पंकज भंडारी यांचा पाठपुरावा
भद्रावती येथे प्रख्यात जैन तीर्थक्षेत्र पार्श्वनाथ मंदिर आहे. यवतमाळ जिल्ह्यतील तसेच वणी येथील जैन समाजातील भाविकांना जुनाडा पुलाचा फायदा होणार आहे. जुनाडा येथे वर्धा नदीवर ओव्हरब्रिज व्हावे यासाठी वणी येथील व्यावसायिक पंकज बन्सीलाल भंडारी यांनी 2003 पासून सतत मागणी करून पाठपुरावा केला होता. पंकज भंडारी यांनी बांधकाम विभाग, मंत्रालय, आमदार, खासदार तसेच कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून जुनाडा येथे पुल बांधण्याची मागणी रेटून धरली होती.

हे देखील वाचा:

तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू

कौटुंबिक वादातून आपसात भिडले सगेसोयरे, दोघे जखमी

Leave A Reply

Your email address will not be published.