सांडपाण्याचा वाद, महिलेची शेजा-याला चपलेने मारहाण

एकाचा जबडा फॅक्चर, काळे ले आऊटमधली घटना

 

विवेक तोटेवार, वणी: सांडपाणी जाण्याच्या वादातून एका इसमाला एका महिलेसह तिघांनी लाथा बुक्यांनी आणि चपलेनी मारहाण केली. या मारहाणीत इसमाचा जबडा फ्रॅक्चर झाला. शहरातील काळे ले आउटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेश दशरथ धांडे (40) रा. काळे ले आऊट वणी हे आवारी यांच्या घरी किरायाने राहतात. यांच्याच घराशेजारी एक महिला (33) राहते. काही दिवसांपासून सांडपाणी जाण्याच्या कारणावरून धांडे कुटुंबीयाचा या महिलेशी वाद सुरू होता. 27 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता याबाबत या महिलेचा महेशशी वाद झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर एक तासाने महेश हा पत्नीसोबत सकाळी 8 वाजता दरम्यान कामानिमित्ताने शिरभाते गल्लीतून जात होता. यावेळी आरोपी महिला हिने दोन व्यक्तींना सोबत घेऊन महेश व त्याच्या पत्नीला गाठले. सकाळी झालेल्या वादाबाबत त्यांनी जाब विचारत महेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत महेश याच्या दाताला इजा झाली व रक्त निघत होते. शिवाय महिलेने महेशला चपलेने मारहाण केली.

वाद सुरू असतानाच महेश याची आई जिजाबाई ही मध्यस्ती करण्यास गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. महेश यांनी त्वरित वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. परंतु उपचारासाठी ते चंद्रपूर येथे निघून गेले. तिथे त्यांना त्यांचा जबडा फॅक्चर असल्याचे समजले.

त्यांनी उपचार घेऊन याबाबतची कागदपत्रे वणी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 3 आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 325, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपस वणी पोलीस करीत आहे

Comments are closed.