विवेक तोटेवार, वणीः किशोरवयीन मुली अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणीतून जात असतात. त्या आपल्या पाल्यांसोबत या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्यांचे समुपदेशन व शारीरिक व मानसिक तपासणी करणे तेवढेही आवश्यक आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी किशोरवयीन मुलींसाठी स्थानिक महावीर भवन येथे मोफत मार्गदर्शनाचा कार्यक्रम 22 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 वाजता आयोजित केला. शाळा व महाविद्यालयांतील किशोरवयीन मुलींनी याचा लाभ घेतला.
वयानुरूप शरीरात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलानंतर घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त असे मार्गदर्शन डॉ. डॉ. गिरीश माने व डॉ. वृषाली माने यांनी केले. मासिक पाळी या विषयावर त्यांनी वैद्यकीय मार्गदर्शन केले.
वाढत्या वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी या विषयावर तज्ज्ञांनी चर्चा केली. किशोरवयीन मुली या विद्यार्थीनी असतात. त्यांच्या या शारीरिक व मानसिक बदलांचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये याची दक्षता घेण्याचा आग्रह तज्ज्ञांनी केला. आहारात योग्य त्या पोषक घटकांचा समावेश करावा, तसेच नियमित व्यायाम करावा असे तज्ज्ञ म्हणाले.
डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शदनात संगीता खटोड, विजया आगबत्तलवार, डॉ. प्रीती लोढा, आशा टोंगे, पूजा गढवाल, डॉ. वीणा चवरडोल व महिला आघाडीने शिबिराची व्यवस्था सांभाळली. डॉ. जयसिंग गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, सूर्यकांत खाडे, मत्ते, गणेश कळसकर, जम्बे, स्वप्निल धुर्वे, शम्स सिद्धिकी, महेश पिदुरकर, राजूभाऊ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या विशेष मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात किशोरवयीन मुलींनी लाभ घेतला.