कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप
राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे घेण्यात आले होते प्रशिक्षण
विवेक तोटेवार, वणीः आज सर्वच क्षेत्रांत महिला स्वावलंबी झाल्या आहेत. मग आत्मरक्षणामध्ये मागे का ? आत्मरक्षणाची नवनवी साधने स्त्रियांनी आत्मसात केली पाहिजे. असं प्रतिपादन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण येथील आदर्श हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा सोमवारी समारोप झाला. या समोरोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पी के टोंगे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेंद्र लोढा, राजाभाऊ बिलोरिया, महेश पिदुरकर, संगीता खटोड, पूजा गडवाल, सिराज सिद्धीकी होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संगीता अशोक खटोड आणि विजयालक्ष्मी आगबत्तलवार यांच्या मार्गदर्शनात शनिवार दि. 19 मे ते 10 जून 2018 या कालावधीत स्थानिक आदर्श हायस्कूल येथे सायंकाळी 5 ते 7 दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं होतं. यात 6 ते 40 वर्षे वयोगटांतील जवळपास 125 महिलांनी प्रशिक्षण घेतलं. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी कराट्याचे प्रात्यक्षिकेही करून दाखवली. या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण करणा-या महिलांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले.
या सर्वांना नेस्कीन मंक्स कुंग फू ब्लॅक बेल्ट होल्डर कैलाश बिडकर यांनी प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रमात संगीता खटोड यांनी प्रशिक्षणानंतर महिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे सांगत भविष्यात असे महिलांना सर्वच क्षेत्रातील यशांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न ते करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
या यशस्वितेसाठी संजय जुंबळे, सूर्यकांत खाडे, राजाभाऊ उपरकर, नितीन गोडे, राहुल झिल्टे यांनी प्ररिश्रम घेतले.