कायर येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण

डॉ. लोढा यांच्या पुढाकारातून कायरवासियांना मिळाले वाचनालय व अभ्यासिका

0

सुरेंद्र इखारे, वणी: आज वाचन ही एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वाचनातून घडते. त्यामुळे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. आज ग्रामीण भागातील तरुणाई कुठेही मागे नाही. मात्र योग्य सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही. आता वाचनालय आणि अभ्यासिका दोन्हीही सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी परिसराचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. कायर येथे सार्वजनिक वाचनालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला कायर येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचा व अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार ख्वाजा बेग यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयसिंगजी गोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्यातून हे ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली. ग्रंथालयात बँक, एमपीएससी, यूपीएससी, राज्यसेवा, तलाठी इत्यादी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसह विविध विषयांवरील संदर्भग्रंथांचा समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कायर व परिसरात अनेक तरुणांची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. सर्व परीक्षेच्या पुस्तकं घेणं विद्यार्थ्यांना शक्य नसतं. तसेच अभ्यासिका व वाचनालय नसल्याने विद्यार्थ्यांना वणीला यावं लागायचं. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कायर येथील तरुणांनी पुढाकार घेऊन डॉ. महेंद्र लोढा यांची ग्रंथालयासंबंधी भेट घेतली होती. त्यानुसार ग्रंथालय व सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाचनालयाचे व अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.

या वाचनालयाचे व्यवस्थापक नंदकिशोर अंभोरे असून लोकार्पण सोहळ्याच्या वेळी प्रमुख प्रभाकर मानकर, संजय जंबे यांच्यासह विशाल ठाकरे, अमोल ठाकरे, गजानन लकशेट्टीवार, संतोष बरडे, विशाल पारशीव, संदीप धवणे, अंकुश नेहारे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.