खडकीची शाळा विद्यार्थ्यां अभावी बंद !

एकाच दिवशी काढल्या पालकांनी टीसी

0
सुशील ओझा, झरी: एकाच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेतून टीसी काढून नेल्याने तालुक्यातील खडकीची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ग तीन असताना शिक्षक एकच असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे..
सर्व शिक्षा अभियानातून एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, असे धोरण शासनाने आखले आहे. परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या धोरणाचा बोजवारा उडत आहे. तालुक्यातील खडकी येथे जिल्हा परिषद शाळा असून, या शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग आहे. दुसऱ्या वर्गात एकही विद्यार्थी नसल्याने हा वर्ग बंद होता. एकूण चारपैकी तीन वर्ग सुरू होते.

२०१८-१९ या वर्षात पहिल्या वर्गात १ विद्यार्थी, वर्ग दुसरीत एकही विद्यार्थी नाही, वर्ग तिसरीमध्ये ४ विद्यार्थी, चौथ्या वर्गात १० विद्यार्थी शिकत होते. परंतु यावर्षी वर्ग १ चा विद्यार्थी व वर्ग ४ चे पाचही विद्यार्थी पास झाले. त्यांनी शाळा सोडून टीसी काढून नेली. तर तिसऱ्या वर्गातील तीन विद्यार्थी शाळा सोडून गेले असून, सध्या शाळेत चौथ्या वर्गाकरिता एकच विद्यार्थी शिल्लक आहे. विद्यार्थी बाहेर गावी असल्यामुळे शाळेत हजेरीपटावर उपस्थित दिसत आहे. परंतु तो येताच टीसी काढून जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे खडकीची जिल्हा परिषद शाळा बंद होणार हे निश्चित झाले आहे.
खडकी जि. प. शाळेत तीन वर्गाकरिता भैया धोंगडे व रमेश वैद्य असे दोन शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. परंतु वैद्य यांना गणेशपूर (जुना) अडीच महिने व त्यानंतर धानोरा येथे संपूर्ण सत्र संपेपयंर्त डेप्युटेशनवर पाठविण्यात आले. यामुळे तीनही वर्गाचा भार धोंगडे यांच्यावर पडला होता. यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
परिणामी, पालकवर्गात संतापाची लाट पसरली. यातूनच सर्व पालकांनी एकाच दिवशी सर्व विद्यर्थांची टीसी काढून मुकुटबन येथील शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे खडकी येथील जिल्हा परिषद शाळा बंद होऊन पुढे सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.