पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर चाकू हल्ला

बोरी (गदाजी) येथील घटना, जखमीवर यवतमाळ येथे उपचार सुरू

0

भास्कर राऊत, मारेगाव: पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला. तालुक्यातील बोरी (गदाजी ) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. सोनबा आनंदराव कोरझरे (45) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी आरोपी विशाल उईके ( 27) याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. तर जखमीवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की सोनबा आनंदराव कोरझरे (45) हे बोरी (गदाजी) येथील रहिवाशी आहे. दि. 23 जुलैच्या रात्रीच्या 8. 45 वाजताच्या दरम्यान घरी आलेल्या पाहुण्याला सोडून घराकडे परत निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले अंकुश सोनबा कोरझरे (22) व मंगल सोनबा कोरझरे (15) होते. रस्त्यात असलेल्या पानठेल्यावर खर्रा घेऊन घराच्या दिशेने जात असतानाच त्यांना आरोपीचा भाऊ मंगेश उईके हा भेटला.

त्याच्यासोबत बोलत असतानाच आरोपी विशाल उईके ( 27) हा मागून आला आणि त्याने सोनबा कोरझरे यांच्यावर चाकूने वार करीत जखमी केले. ही घटना गदाजी महाराज यांच्या मंदिराच्या गेटसमोर घडली. सोनबा कोरझरे यांच्या पोटावर चाकूने वार केल्याने त्यांच्या शरीरातून रक्त वाहायला लागले. अशातच आरोपीने घटना स्थळावरून पोबारा केला.

जखमी सोनबा यांना क्रूझर वाहनामध्ये मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. आरोपीला दि. 23 जुलैच्या रात्रीच दोन ते तीन च्या दरम्यान अटक करण्यात आली असून त्याचेवर कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. जगदीश बोरणारे, पो. कॉ. राजू टेकाम करीत आहेत.

हे देखील वाचा:

जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार

Leave A Reply

Your email address will not be published.