चायनीज फूडच्या वादातून चाकूहल्ला, तरुण थोडक्यात बचावला

विचित्र भांडणातून होणार होते मोठे कांड, साईमंदिर चौकातील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: संयम सुटला, की अनेक दुर्दैवी घटना घडतात. त्यात अनेकदा जीवही जातो. भांडणासाठी फक्त कारण हवं असतं. ते छोटं की मोठं हे महत्त्वाचं नाही. शहरातील साई मंदिर चौकातील स्टेट बँकेजवळ जो प्रकार घडला तो सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारा आहे. ग्राहकाने चायनीज फूड स्टॉलवर सायंकाळी मेनूची ऑर्डर केली. तो लवकर न आल्याने तिथेच वाद उफाळला. त्यातून चंद्रपूर येथील तिघांनी फूड स्टॉल मालकासह त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी वाद सोडविण्यासाठी एकाचा नातेवाईक आला. तर आरोपीने दुकानात वापरण्यात येणारा चाकू उचलून त्याच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण थोडक्यात बचावला, मात्र त्याच्या मनगटावर जखम झाली.

तेलीफैलातील कुणाल रमेश लोहकरे (32) व त्याचा भाऊ रोहित लोहकरे हे दोघेही साई मंदिर चौकात स्टेट बँकेजवळ चायनीज फूड स्टॉल चालवतात. 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या चायनीज दुकानात काम करत होते. तेवढ्यात त्यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील कोसारा येथील त्यांचा मावसभाऊ सारंग संजय साठोणे हा आपल्या तीन अनोळखी मित्रांसह तेथे आला. त्यांनी तिथं चायनीज फूडची ऑर्डर केली.

दुकानात आधीच ग्राहक असल्यामुळे त्यांना चायनीज देण्यास उशीर झाला. या रागातून आरोपी व त्याच्या मित्रांनी कुणाल लोहकरे यांना शिवीगाळ करत थापडबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मालकाला सोडविण्यासाठी दुकानात कूक म्हणून काम करणारा शंकर मोडक हा मध्ये आला असता. आरोपीने त्यालाही मारहाण केली.

भांडण शांत करत असतानाच आरोपी सारंगने चायनीज स्टॉलवर ठेवलेला चाकू उचलला. लहेश लोहकरे याच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ वार करून जखमी केले. यानंतर आरोपीने वडिलांचे जुने व्यवहाराचे पैसे मागून काऊंटरमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्ही पुन्हा भेटलात तर जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली.

काही वेळानंतर रेल्वे गेटजवळून डब्बा घेऊन जाणाऱ्या कुणालच्या पत्नीलादेखील आरोपीने शिवीगाळ करत धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सारंग संजय साठोणे व त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरुद्ध कलम 3(5), 351(3), 351(2), 352, 351(4), 115(2), 118(1) नुसार गुन्हे दाखल केलेत. पुढील तपास वणी पोलिस करत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.