भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला, दोघांना अटक.... जखमीचा जिवाच्या आकांताने पळ, पाठलाग करत हल्लेखोर पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये

विवेक तोटेवार, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केला. शहरातील वरोरा रोडवर भर दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे जखमीने जिवाच्या आकांताने पळ पोलीस स्टेशन गाठले असता आरोपीनेही सहका-यासह चाकू घेऊन त्याचा पाठलाग करत पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान ही बाब ठाण्यातील कर्मचा-यांना लक्षात येताच त्यांनी तातडीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की जखमी अनिकेत मनोज मोगरे (22) हा सेवा नगर येथील रहिवाशी आहे. तो नगर पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. अनिकेतला बँड वाजवण्याचा छंद असल्याने तो पार्ट टाईम बँड पथकातही काम करतो. तर आरोपी हरिष उर्फ टिक्या संजय रायपुरे (23) हा दामले फैल येथील रहिवाशी आहे. दोन महिन्याआधी डिसेंबर महिन्यात अनिकेत आणि आरोपीचा वासेकर ले आउट येथील एका मंगल कार्यालयासमोर दुचाकी ठेवण्यावरून वाद झाला होता.

सोमवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान अनिकेत वरोरा रोडवरील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात एका लग्न सोडळ्यात बँड वाजवत होता. त्यावेळी तिथे हरीष रायपुरे त्याच्या सहका-यासह तिथे पोहोचला. तिथे त्यांनी अनिकेतला मारहाण केली. त्यामुळे अनिकेत तिथून पळत सुटला. आरोपीने त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान मंगल कार्यलयापासून अगदी काही अंतरावरच प्रगती नगर स्टॉपजवळ हल्लेखोरांनी त्याला गाठले.

अन् सुरू झाला भरदिवसा थरार…
प्रगती नगर स्टॉपजवळ दिवसा ढवळ्या हल्लेखोरांनी अनिकेतवर चाकूने हल्ला केला. चाकूचा वार त्याच्या पाठीत लागला. त्यामुळे जिव वाचवण्यासाठी त्याने तिथून पळ काढत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. मात्र हल्लेखोरही त्याचा पाठलाग करत होते. अनिकेत पोलीस ठाण्यात पोहोचला असता तिथे हल्लेखोरही चाकू घेऊन पोहोचले. दरम्यान हा प्रकार ठाण्यात असलेल्या कर्मचा-यांच्या लक्षात आला. त्यांनी हरीष आणि त्याचा सहकारी अमोल अरोलवार या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळील चाकू जप्त केला.

पोलिसांनी जखमीवर उपचार करण्यासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तिथे उपचार करण्यात आला. उपचारानंतर त्याला सुटी देण्यात आली. संध्याकाळी अनिकेतने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार केली. पोलिसांनी आरोपी हरीष रायपुरे आणि त्याचा सहकारी अमोल उर्फ दुर्लभ व्यंकटेश आरेलवार (20) रा. दामले फैल यांच्या विरोधात भादंविच्या कलम 307 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउनि प्रवीण हिरे व पोलीस अंमलदार शुभम सोनूले करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

Comments are closed.