परिवर्तनवादी कोलाम समाजाच्या आश्चर्यकारक परंपरा….
ब्युरो, मारेगाव: तालुक्याची आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे,कारण या तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी कोलाम बांधवाविषयी वास्तव्य असून,याच तालुक्यात इतरही आदिवासी समाज असला तरी संख्येच्या बाबतीत आदिवासी कोलाम बांधव संख्येने जास्त असल्याचे सर्वेक्षण आहे. हा समाज गावकुसापासून दूर दहा बारा घरांची वस्ती करुन राहतो त्याला “पोड” असे संबोधले जाते. या समाजाचे राहणीमान अत्यंत साधे पण विशेष असते. त्यांच्या वस्तीत गेल्यावर त्यांचा टापटिपपणा, आलेल्यांचं अत्यंत आदराने स्वागत करण्याची पध्दती आणि विशेष म्हणजे त्यांच्या समाजातील एकसंधपणा हा गुण विशेष वाखाणण्याजोगा आहे.
ह्या समाजाचा सांस्कृतिक इतिहास पाहता त्यांचे सण उत्सावातील देव, देवता कोणी काल्पनिक नाहीत तर तो समाज आपल्या कर्तबगार पूर्वजांना आपले दैवत मानत असल्याने त्या कोलाम समाजात आजही अंधश्रध्देला थारा नाही. त्यांचे विवाहसंस्कार हे जास्तीत जास्त वधुपक्षाकडे होत असल्याने, स्त्रीप्रधान संस्कृतीचे समर्थक असेल असा अंदाज निघतो. त्यांच्या लग्नात हुंडा नावाची गोष्टच नसल्याने त्या समाजात हुंडाबळीची समस्याच नाही. त्यांच्या पोड वस्तीवर चावडी असते त्यात ते गावातील काही समस्या तेथे सोडवून समाजात एकी कायम ठेवतात.
आज हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून खूप दूर आहे. केवळ निवडणुकीच्यावेळी राजकीय नेते त्यांच्या पोडांवर विविध आश्वासनांची खैरात देतात. त्याला हा साधाभोळा समाज भुलून त्यांच्यावर विश्वास ठेऊन डोळे लाऊन आपले अमूल्य मत देतो. त्यामुळे आदिवासी बहुल भागात निवडणुकीत तरुणांना दारूचे व्यसन लावणारे, त्या समाजातील कुमारी मातेसारख्या अंगावर शहारे आणणाऱ्या समस्या आजही कायम असून शासनव्यवस्था त्याकडे डोळेझाक करीत असली तरी ह्या समस्यांचं खरं मूळ राजकारण अन् राजकीय नेते असल्याचं सर्वश्रृत आहे. त्यांच्याकडे सोईसुविधेच्या बाबतीत शासन व्यवस्था ही काही स्वार्थी राजकीय षडयंत्रामुळे पोहचू देत नाही. शिक्षणाच्या बाबतीत तर केवळ देखाव्याचं शिक्षण दिले जाते. कारण शाळेत मिळणारी खिचडी म्हणजे शिक्षण असा समज केल्यामुळे तो समाज आजही आधुनिकतेच्या कोसो दूर दिसतो. त्यांच्या समाजात आजही अनेक कलाकार आहे, कीर्तनकार गंगाधर महाराज लोणसावळेसारखे समाजाचे प्रबोधन करुन समाजात जागृती करण्याचं काम करतात.
त्या समाजाची प्रेरणा बिरसामुंडा, श्यामादादा कोलामसारखे लढवय्या महामानव असल्याने तो समाज आजही भयमुक्त जीवन जगतो या समाजात जन्मजात कलेची आवड असल्याने समाज कलेची कदर करुन अनेक पारंपारिक गाणे, नाटके ते आपल्या पोटावर सादर करुन कलेची कदर करतात. परंतु या समाजाची दखल कोणतीच प्रसारमाध्यमे घेत नसल्याने तो माज विकासापासून दूर आहे. त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरील विविध योजना, हक्क, अधिकार माहिती होण्यासाठी जागृतीची गरज असून त्या समाजातील काही प्रमाणात असलेले राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कलाकार यांनी त्या परिवर्तनवादी कोलाम समाजाला न्याय, हक्क बहाल करुन समाजाला मुख्ये प्रवाहात आणण्याची गरज आहे.