कोतवाल भरती प्रकरणी पैशाची मागणी केल्यास संपर्क साधा – एसडीओ

जितेंद्र कोठारी, वणी: कोतवाल पदभरती ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांचीच या पदासाठी निवड केली जाणार आहे. निवडीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांना पदाचे आमिष दाखवून पैशाची मागणी मागणी केल्याचे आढळल्यास, याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याशी संपर्क साधावा व होणारी फसवणूक टाळा असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे. एसडीओ यांनी आज एक प्रेस रिलिज काढून याबाबत आवाहन केले आहे.

वणी तालुक्यातील कोतवाल पदभरती 2023 साठी सध्या प्रक्रिया सुरु आहे. वणी तालुक्यातील शिरपूर, ब्राह्मणी, कोलेरा, वांजरी, वेळाबाई-2, चारगाव, शिंदोला, साखरा (कोलगाव) वागदरा, उमरी, पळसोनी, मोहुर्ली, मारेगाव (कोरंबी) अशा 14 साजांसाठी ही पदभरती आहे. आधी या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 21 जुलै होती. मात्र सध्या ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता 28 जुलैच्या संध्या. 6.15 वाजे पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

मानधनात घसघशीत वाढ
आधी कोतवाल या पदासाठी एकत्रित 5 हजार रुपये मानधन होते. मात्र आता यात वाढ केल्याने मानधन 15 हजार रुपये झाले आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. परिणामी या पदासाठी सेटिंग करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याची भीती देखील वाढली आहे. सदर भरती ही आरक्षणाच्या रोस्टरप्रमाणे भरण्यात येणार आहे. 28 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत भरतीची प्रक्रीया चालणार आहे.

जसे पोलीस प्रशासन आणि गाव यातील दुवा हा पोलीस पाटील असतो. तसाच महसूल विभाग आणि गाव यातील दुवा हा कोतवाल असतो. कोतवालांना गावाची माहिती असते त्यामुळे कोतवाल हा महसूलच्या कामात तलाठ्यांना मदत करीतो. आधी यासाठी लोक फारसे इच्छुक नव्हते. मात्र अलिकडे शासनाने कोतलांचे मानधन वाढवल्याने कोतवालाचे गावपातळीवरील महत्त्व वाढले आहे शिवाय या पदासाठी इच्छुकांची देखील संख्या चांगलीच वाढली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.