खुनी नदीचा रंग की हो ‘हिरवा’

पाणी पुरवठा बंद केल्याने परिसरात जलसंकट

0 352

सुशील ओझा, झरी: कळंब तालुक्यात उगमस्थान असलेल्या खुनी नदीचा केळापूर, झरी तालुक्यात विस्तार आहे. जवळपास सहा दिवसांपासून खुनी नदी हिरवी झाली असून, मंगळवारी सातव्या दिवशीही तिचा रंग बदललेला नाही. स्थानिक प्रशासनाने तोंडी आदेशाव्दारे पाणीपुरवठा बंद करून नदी पात्रातील पाण्याचे नमुने घेतले. त्यानंतर मात्र उदासीन धोरण अवलंबवले आहे. जिल्हा प्रशासन तर या गंभीर विषयाबद्दल पूर्णत: ‘अनभिज्ञ’ आहे. त्यामुळे हजारो नागरिकांवर जलसंकट ओढवले आहे.

खुनी नदीतील हिरव्या रंगाच्या पाण्याचा प्रकार लक्षात आल्याने झरी तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतने पाणीपुरवठा बंद केला होता. दाभा येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ या प्रदूषणाबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांना खाज सुटली तसेच शरीरावर फुन्सी आल्या होत्या. पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना सध्या कुठलाही त्रास नाही. अशी माहिती दाभाचे माजी पोलीस पाटील महादेव रिटे यांनी दिली. एकूणच हे पाणी शरीराला घातक असल्याचे यातून स्पष्ट होते.

खुनी नदी पात्रातील हिरव्या पाण्यामुळे टाकळीवासी चांगलेच चिंतेत सापडले आहे. हिरव्या पाण्यामुळे गावाचा पाणी पुरवठाच बंद झाला असून, प्रशासनही गंभीर दिसत नसल्याने त्यांच्यापुढे जलसंकट उभे झाले आहे. ग्रामपंचायत व सरपंचांनी पुढाकार घेऊन तात्पुरती पाण्याची व्यवस्था केली असली तरी कुठपर्यंत असे चालणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे. टाकळी सरपंच संदीप बुरेवारसह देवराव जिड्डेवार, दीपक राडेवार, लक्ष्मण जिड्डेवार, महादेव मले यांनी हिरव्या पाण्याबाबत प्रशासन गंभीर दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

प्रदूषित झालेल्या खुनी नदीचा पाणीपुरवठा किती दिवस बंद राहणार, याबाबत प्रशासनाने कुठलीही माहिती जाहीर केली नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंप आणि बोअरवेलच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. नदी पात्रात हिरव्या रंगाचे पाणी सहा दिवसांपासून पहायला मिळत आहे. आता याचा रंग थोड्या प्रमाणात ओसरला आहे. अद्याप पाण्याच्या परीक्षणाचा अहवाल आला नसल्याने पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Loading...