सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे एलसीबीचे पथक येणार असल्याची खात्रीजनक माहिती अवैध दारू विक्रेत्यांना मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा येऊनही एलसीबी पथकाच्या हाती काहीच लागले नाही. अखेर पथक रिकाम्या हाती यवतमाळला परतले. त्यामुळे धाड पडणार ही माहिती अवैध धंदेवाल्यांना आधीच कोण पुरवतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, तेजापूर, बोपापूर इ गावात अनेक जण अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात आहे. या गावात राजरोसपणे हे धंदे चालतात. तर खातेरा, कोठोडा, गाडेघाट व परसोडा घाटावरून चंद्रपूर जिल्यात दररोज 100 ते 200 पेटी दारुची तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात केली जाते.
वरील गावात मुकुटबन व पुरड येथून दारूचा पुरवठा चारचाकी व दुचाकीने होतो. गावातील धाब्यावरही दारूची राजरोसपणे विक्री होत आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केल्या जात नाही. एक व दोन बॉटल वाल्याला पकडून केस करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत धन्यता मानत आहे.
वणी बहुगुणीने वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने यवतमाळ एलसीबीच्या पथकांनी 12 मे रोजी मुकुटबन व परिसरातील छापेमारीसाठी आले. परंतू धाड पडण्याची माहिती आधीच अवैध दारू विक्री करणा-यांपर्यंत पोहचविल्याने एरव्ही राजरोसपणे सुरू असलेली दारू विक्री झटक्यात बंद झाली.
सोमवारी 17 मे रोजी पुन्हा एकदा मुकूटबन येथे एलसीबीचे पथक छाप मारण्याकरिता आले. परंतु ही माहितीसुद्धा लिक झाली. दुपारी 12 ते 1 दरम्यान पथक आले व दिवसभर फिरले. पण कुणीच अवैध विक्री करताना आढळले नाही त्यामुळे पथकाची माहिती कोण लिक करत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. हा झारीतील शुक्राचार्य कोण की ज्यामुळे धाड दरवेळी अपयशी होत आहे, याचा विचार आता पोलीस विभागाने करणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा:
प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर