ओबीसींच्या विराट मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांचा व सामाजिक संघटनांचा पाठिंबा
3 जानेवारीला वणी तहसीलवर भव्य मोर्चाचे आयोजन
जब्बार चीनी, वणी: ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी वणीमध्ये 3 जानेवारीला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या या मोर्चानिमित्त ठिकठिकाणी जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे. बुधवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी शहरातील वसंत जिनिंग येथे मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेत मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जातनिहाय जनगणना मोर्चा कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार व निमंत्रक मोहन हरडे हे होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा कऱण्यात आली. बैठकीअंती सर्व पक्षीय नेत्यांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी समर्थन दर्शवीत त्या संदर्भात आयोजित मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.
बैठकीचे प्रास्ताविक प्रवीण खानझोडे यांनी केले. तर मोहन हरडे यांनी ओबीसी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. प्रदीप बोनगिरवार यांनी उपस्थित सर्व राजकीय पुढाऱ्यांना मोर्च्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सभेचे आभार प्रदर्शन विकास चिडे यांनी केले.
महिलांद्वारे घरोघरी जाऊन प्रबोधन
ओबीसींमध्ये त्यांच्या न्याय व हक्कासाठी जनजागृती झाली पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पण त्याला सार्वत्रीक रुप आले नव्हते. यावेळी ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला बाहेर पडल्या असून त्या शहरात घरोघरी जाऊन ओबीसी जनगणनेचे महत्त्व समजावून त्याबाबत जनजागृती करीत आहे. पहिल्यांदाच एखाद्या मोर्चासाठी महिला पुढाकार घेत असल्यने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सभेला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे संजय निखाडे, राजू तुराणकर, ललित लांजेवार, राजेंद्र देवडे, काँगेसचे राजाभाऊ पात्रडकर, प्रमोद निकुरे, सुरेश मांडवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ लोढा, जयसिंग गोहोकार, महेश पिदूरकर, राजाभाऊ बिलोरीया, मनसेचे राजू उंबरकर, अज्जू शेख, धनंजय त्र्यंबके, मराठा सेवा संघाचे अजय धोबे, अमोल टोंगे भाजपचे रवी बेलूरकर, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, वंचित बहुजन आघाडीचे मंगल तेलंग, मिलिंद पाटील, गणेशपूरचे सरपंच तेजराज बोढे, विजय कडूकर, ऋषिकेश पेचे, गजानन चंदावार, राम मुडे व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: