सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे ‘रात्रीस चाललेल्या खेळाने’ आता वेगळेच वळण घेतले आहे. कहाणीमे ट्विस्ट येत पोलिसांनी चक्क दारू सापडली ते ठिकाण बदलवल्याने परिसरात एकच खमंग चर्चा रंगली आहे. लॉकडाऊऩच्या काळात अवैध दारू विक्री प्रकरणी कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कार्यवाई होत आहे. अशी कारवाई होऊन नये यासाठी या प्रकरणी ठरवून ‘ट्विस्ट’ आणल्याचा आरोप होत आहे. मात्र दारू कुठे पकडली हे अनेकांनी पाहिल्याने पोलिसांच्या कहाणीची ‘भट्टी’ काही जमली नसल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील मुकूटबन येथे 14 एप्रिलच्या रात्री दारू नाट्य घडले होते. रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान एका परवानाधारक देशी दारूच्या पेट्या काढत असताना वॉर्डातीतील काही तरुणांनी दारूचे बंपर विकत घेतले. 15 ते 20 पेटी देशी दारूसोबत इंग्लिश दारूच्या पेट्याही बोलेरो व स्कॉर्पिओ गाडीने गावात व पाटण परिसरात विक्री पोहचविण्यात आल्याचे बोलले जात आहे. देशी दारूच्या पेट्या भट्टीतून काढत असताना महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यामुळे सदर तरुणांनी दारूची पेटी सोडून पळ काढला होता.
देशी दारूची पेटी महिला पोलीस यांनी रात्रीच घेऊन पोलीस स्टेशनला नेली. दुसऱ्या दिवशी जप्त केलेल्या दारूच्या पेटीबाबत माहिती घेतली असता येथीलच एका देशी दारूच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करणारा भूमन्ना कल्लेमवारची असल्याच्या माहितीवरून त्याला अटक करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची भूमिका आणि संशयकल्लोळ…
14 एप्रिलला रात्री दारू जप्त करण्यात आली. त्यामुळे त्याच रात्री गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना गुन्हा दाखल केला गेला नाही. तो दुस-या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला करण्यात आला. दारूची पेटी भट्टी समोरून जप्त करण्यात आली होती. मात्र दुस-या दिवशी जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी भट्टी समोर दारू सापडल्याचा उल्लेख गाळून त्या ऐवजी स्थळ बदलवण्यात आले. हे स्थळ वणी मुकूटबन मार्गावरील पेसिफिक बार समोर जप्त केल्याचे दाखवण्यात आले. भट्टीसमोर दारू पकडल्याची घटना परिसरातील अनेक लोकांनी पाहिली, मात्र तरी देखील या घटनेचे स्थळ का बदलवण्यात आले? या विषयी संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच पोलिसांनी जी कहाणी तयार केली आहे. त्याची ‘भट्टी’ जमली नसल्याचे बोलले जात आहे. सोबतच या प्रकरणाला वेगळा रंग देण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चाही गावात चांगलीच रंगली आहे.
कारवाई टाळण्यासाठी खटाटोप?
लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारू विक्री करणा-यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करत दुकानाचा परवाना रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. त्यात वणीच्या एका बारचाही समावेश आहे. प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळेच पोलिसांनी धावपळ सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याऐवजी भट्टीच्या मॅनेजरवर थातूरमातूर कारवाई करून भट्टीला वाचवण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण स्टोरी तयार केल्याची खमंग चर्चा परिसरात रंगली आहे.
उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची युती?
एका देशी दारू दुकानातून 55 पेटी दारू दुकानातून काढून विकल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. ज्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. लॉकडाऊन मुळे गावात दिवसरात्र पोलीस बियरबार व देशी दारूच्या दुकानासमोरून गाडी व दुचाकीने फिरतात. मग त्यांना हे कसे काय नाही दिसले? लॉकडाऊऩच्या काळात दारूची अवैध विक्री होऊ नये यासाठी दारूच्या दुकानाला सिल लावण्यात आले आहे. मात्र तरी देखील दारूची तस्करी सुरूच आहे. सिल लावले असताना दारूच्या विक्रीला आळा बसणे गरजे असताना दारूची तस्करी होतेच कशी हे सुद्धा एक न उलगडलेले कोडेच आहे. बियरबार व देशी दारू दुकानाचे सिल तोडून तर ही विक्री होत नाही अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. तोडलेले सिल पुन्हा लावण्याची सुविधा उपलब्ध असून ही सुविधा प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपयात उपलब्ध आहे यात एक कर्मचारी सामिल असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांची भूमिका संशयाच्या भोव-यात सापडली आहे. भट्टीजवळ जप्त केलेली पेटी दुसऱ्या स्थळावर दाखवून दारूचीभट्टी वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चेला सध्या ऊत आला आहे. त्यामुळे या प्रकऱणाची सखोल चौकशी होण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.