लोकमान्य टिळ्क़ महाविद्यालयात लोकमान्य स्मृती व्याख्यान
जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य सभागृहात यावर्षीची लोकमान्य स्मृती व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांनी “लोकमान्यांची चतु:सूत्री” या विषयावर विचार व्यक्त केले.
लोकमान्यांनी सांगितलेल्या स्वदेशी, स्वराज्य, विदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा सद्यकालीन संदर्भात आढावा घेतला. तसेच डॉ. करमसिंग राजपूत यांचे ‘भारतीय शेतीची वर्तमान स्थिती’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी शेतीच्या विविध आयामांना उदाहरणसह स्पष्ट केले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के तथा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुंधती निनावे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य निनावे यांनी प्रतिवर्षी बाहेरून ख्यातनाम वक्त्यांना बोलावून सादर होणाऱ्या या व्याख्यानमालेत यावर्षी आपल्या महाविद्यालयातील स्थानिक प्रतिभेला उत्तेजन देण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळाची भूमिका सादर केली. वक्त्यांचा परिचय लक्ष्मण भेदी यांनी करून दिला.
कार्यक्रमात,डॉ. अजय देशपांडे यांच्या संपादनात साकारलेल्या, “आराधना” या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे आणि डॉ. राजपूत यांनी लिहिलेल्या भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात नरेंद्र नगरवाला यांनी या व्याख्यानमालेचा आरंभ करणाऱ्या प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतीला उजाळा देत संस्थेतील शिस्तप्रियतेबद्दल आपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालकगण, मंडळाच्या तिन्ही घटकसंस्थांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तथा वणीतील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.