दिवसाधवळ्या 45 लाखांची लूट, ब्राह्मणी फाट्याजवळील घटना

जिनिंग सुपरवायझरला मारहाण करून हिसकवली 45 लाखांची बॅग

0

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग फॅक्टरीच्या सुपरवायझरला चार जणांनी मारहाण करून 45 लाख रुपये  लुटल्याची घटना घडली. निळापूर ब्राह्मणी मार्गावर अहफाज कॉटन जिनिंग जवळ शनिवारी दुपारच्या 3.35 दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील रात्री वणीत दाखल झाले.

प्राप्त माहितीनुसार निळापूर ब्राह्मणी मार्गावर आनंद अग्रवाल यांच्या मालकीची इंदिरा एक्जिम प्रा. लि. ही जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. अनिल अग्रवाल व देवेंद्र अग्रवाल हे या फॅक्टरीचे संचालक आहे. या जिनिंग फॅक्टरीमध्ये मनिष जगजीवन जंगले (47) रा. ढुमेनगर वणी हे गेल्या 10 वर्षांपासून दिवाणजी म्हणून काम करतात. आज शनिवारी दिनांक 20 मार्च रोजी ते नेहमीप्रमाणे आपली ऍक्टिव्हा (MH 29 AV 5269) या गाडीने बँक ऑफ इंडिया या बँकेत गेले. तिथे जाऊन त्यांनी 45 लाखांचा चेक वटवला. एका पिशवीमध्ये ते पैसे घेऊन बँकेतून जिनिंगमध्ये परतत होते. 

दरम्यान दुपारी ठिक 3.30 मिनिटांनी अहफाज कॉटजीन फॅक्टरी जवळ मागून आलेल्या एक कारने मनिषच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. मनीष दुचाकीसह खाली पडताच कारमधून दोघे जण उतरले. त्यातील एकाने मारहाण करीत मनिष यांचे तोंड दाबले व दुस-याने गाडीला लटकवलेली बॅग हिसकवली आणि ते कारमध्ये बसून पळून गेले. 

हा संपूर्ण घटनाक्रम केवळ दोन मिनिटांमध्ये झाला. लूट होताच मनिष यांनी  3.37 मिनिटानी मालक यांना  याबाबत माहिती दिली. कारने धडक दिल्याने मनिष यात जखमीही झाले. त्यांनी लगेच वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या कलम 394 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास स्वत: ठाणेदार वैभव जाधव करीत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ?
दिवाणजी मनिष जेव्हा बँकेत गेले होते तेव्हा त्यांना रस्त्यात संशयास्पदरित्या एक पांढरी कार (स्विफ्ट डिझायर असल्याचा अंदाज) आढळून आली. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्या कारने ऍक्टिव्हाचा पाठलाग केला व संधी मिळताच दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत ते खाली पडताच  त्यांना मारा आणि त्याच्याकडची बॅग हिसका असे मारहाण करणारे ओरडत होते, अशी माहिती आहे. सध्या कापसाच्या चुका-याचे कोट्यवधींचा व्यवहार होत असल्याने याची माहिती असल्यानेच लूट करण्यासाठी लुटारू गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ठेऊन असल्याचा अंदाज आहे.

वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक ही वणी येथे आले आहे. 

हे देखील वाचा:

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 

Leave A Reply

Your email address will not be published.