दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

घटनेने हादरले मारेगाव शहर, सहा महिन्याआधीही घडली होती अशीच घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मारेगाव येथे आज शनिवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (30) व श्रुती उमेश उलमाले (दिड वर्ष) रा. मारेगाव असे मृतक आई व मुलीचे नाव आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक कोमल उमेश उलमाले (30) ही मारेगाव शहरात प्रभाग क्रमांक 12 येथे शासकीय विश्राम गृहाजवळ आपले पती उमेश उलमाले, 2 मुली व सासू सासरे यांच्यासह राहायची. तिच्या पतीचे आंबेडकर चौक येथे दुकान आहे. शुक्रवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान घरी सर्व झोपलेले असताना कोमल ही आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन घरून निघून गेली. दरम्यान मुलगी व आई घरात नसल्याचे पतीला लक्षात आले. पतीने तिचा रात्री शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र ती आढळून आली नाही.

अखेर आज सकाळी कोमलच्या पतीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत पत्नी व मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान मृतकाच्या घराजवळच असणा-या पुरके आश्रम शाळेनजीक असलेल्या थेरे यांच्या शेतातील विहीरीजवळ चपला आढळून आल्या.

नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता यात कोमल आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

याआधीही घडली होती तालुक्यात अशीच घटना
ऑगस्ट महिन्यात म्हैसदो़डका येथील रहिवाशी असलेली मोनाली लक्ष्मण पारखी या महिलेने तिच्या तीन वर्षीय मुलाला पोटाला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर 2018 मध्ये तालुक्यातील सगणापूर येथे एका महिलेने तिच्या दोन अपत्या सह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. यात सुदैवाने तीन वर्षीय मुलगी वाचली तर आई आणि सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. अद्याप या घटना तालुकावासी विसरले नसतानाच अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

हे देखील वाचा:

लालपुलिया कोळसा धाड प्रकरणी मुख्य आरोपीला पीसीआर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी छळ

Leave A Reply

Your email address will not be published.