बहुगुणी डेस्क, वणी: आनंददायी शिक्षण देण्याचा आज प्रयत्न सुरू आहे. त्यात शिक्षकांपुढे अनेक आव्हाने आहेत. तेव्हा मोकळ्या तासाचा सदुपयोग करा असे मार्गदर्शन विविध कृतियुक्त सहभागातून रिसोर्स पर्सन निहारिका शर्मा यांनी दिले. नवे शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा याबद्दल शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या. “नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका”या विषयावर मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई स्कूल येथे मुख्याध्यापिका शोभना यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून निहारिका शर्मा, पॅरमाऊंट शाळेचे फैय्याज अहमद, भद्रावती मॅकरून शाळेच्या मुख्याध्यापिका राजदा सिद्दीकी व वणी मॅकरूनचा मुख्याध्यापिका शोभना मंचावर उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत संगीता पवार,अजय कंडेवार, संजय सिंग यांनी केले. सदर कार्यशाळेत निहारिका शर्मा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विषयी माहिती दिली. या कार्यशाळेत केंद्र शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण तज्ज्ञांनी विषद केले.
रिसोर्स पर्सन निहारिका शर्मा यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षकांची भूमिका कोणती? शिक्षणातील रटाळता घालवून शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत केलं पाहिजे. शिक्षकांनी आपण गुगलपेक्षा वेगळे आहोत, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अजूनही विद्यार्थी, पालक, समाज यांचा शिक्षकांवर नितांत विश्वास आहे. आता नक्कीच शाळांना नव्याने चांगले दिवस येत आहेत.
शिक्षकी पेशा ही नोकरी न मानता ते एक व्रत आहे. या दृष्टिने शिक्षकांनी कार्य करावे, असेही या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रूपाली वाघमारे यांनी केले. तर आभार नीतेश कुरेकर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



Comments are closed.