पीककर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्जाची रक्कम कमी

महाराष्ट्र बँकेच्या झरी शाखेचा प्रताप, आदिवासी महिला शेतक-याची थट्टा

सुशील ओझा, झरी: पीक कर्ज भरले की पुन्हा तेवढेच कर्ज मिळते. त्यामुळे अधिकाधिक कर्ज मिळण्यासाठी अनेक शेतकरी वेळेत आणि पूर्ण कर्ज भरतो. मात्र झरी तालुक्यात एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. झरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेने माथार्जूनच्या एका महिलेने संपूर्ण पीक कर्जाची रक्कम चुकवल्यानंतर ही तिला कर्ज भरलेल्या रकमेपेक्षा कमी पीक कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे बँकेने थट्टा केली असा आरोप करत महिला शेतक-याने याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

माथार्जुन येथील आदिवासी महिला अनुसया आनंदराव आत्राम यांची गट क्र. 182 येथे 11. 71 हेक्टर आर शेत जमीन आहे. त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून 1 लाख 62 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम भरली व यावर्षीच्या पीक कर्जासाठी अर्ज केला.  त्यांनी संपूर्ण कर्ज भरल्याने त्यांना तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिकच्या कर्जाची अपेक्षा होती. परंतु बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी संपूर्ण कर्ज भरल्या नंतरही 1 लाख 40 हजार मंजूर केले.

बँकेचे कर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्ज 22 हजार कमी मंजूर केले. त्यामुळे वेळेत कर्ज भरून कोणताही लाभ न मिळाल्याने महिला संतप्त झाली व त्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. माथार्जून सह परिसरातील 7 ते 8 गावातील आदिवासी समाजाचे शेतकरी दरवर्षी झरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधून शेती उपयोगा करिता कर्ज उचलतात. उचललेले पीककर्ज दरवर्षी भरून नवीन पीककर्ज उचलतात.

बँकेने केलेल्या अन्यायाबाबत परिसरातील शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कर्जाची पूर्ण रक्कम न मिळाल्यास महिला शेतक-यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सदर बँके बाबत अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदारांसह इतर ठिकाणी तक्रारी करण्यात आले असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

मारेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, नदीकाठावरील शेत पुराखाली

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

Comments are closed.