पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिदिनी पुरस्कार मिळणे हा माझा मोठा गौरव आहे. गीर्वाणवाणी या यु- ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मला समाज अध्यापकत्वाचा आनंद घेता येत आहे. संस्कृत साहित्यावर तयार केलेल्या 400 च्यावर व्हिडिओंमुळे हजारो लोक संस्कृत साहित्याकडे वळले आहेत. हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा विषय आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. महर्षी शंकर धोंडो उर्फ पू. मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी त्यांना प्राचार्य राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हा माझ्यासाठी जैताई मातेच्या चरणी मिळालेला जीवनगौरव पुरस्कार आहे. असे भावोद्गार विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी काढले. त्यांना जैताई देवस्थानातर्फे देण्यात येत असलेला उत्कृष्ठ अध्यापकाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अरुण खानझोडे होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर जैताई मंदिराचे अध्यक्ष माधव सरपटवार व पुरस्काराचे मानकरी विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड हे उपस्थित होते. प्रणिता पुंड व अपर्णा देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘कुंभारा सारखा गुरू नाही रे जगात’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात जैताई मंदिराचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी ज्ञाननिष्ठा, समाजनिष्ठा व विद्यार्थीनिष्ठा जोपासणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो असे म्हटले. गीर्वाणवाणीच्या माध्यमातून प्रा. पुंड हे संस्कृतचे विश्व अध्यापक झाल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. असे त्यांनी यावेळी विशद केले. या मालिकेत दीपक नवले, बैजनाथ खडसे, गजानन कासावार, विवेक कवठेकर, सरोज भंडारी यांना या आधी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अरुण खानझोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व अडीच हजार रूपये नगदी देऊन प्रा. स्वानंद पुंड यांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषण करताना खानझोडे म्हणाले की, टिळकांच्या मृत्यूनंतर मामा क्षीरसागर यांनी आपले जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले. प्रा. पुंड हे सरस्वतीपुत्र आहेत. त्यांच्यावर सरस्वतीची कृपा आहे. समर्पणात आनंद असतो. तो स्वानंदजींच्या ठायी आहे. संस्कार, संस्कृती व संस्कृत यावर त्यांचे खूप प्रेम आहे. त्यामुळे अशा तपस्वी, तेजस्वी व्यक्तीला माझ्या हस्ते पुरस्कार प्रदान करणे हा माझा गौरव समजतो. या कार्यक्रमाचे संचालन जैताई देवस्थानचे सचिव मनू महाराज तुगनायत यांनी केले. आभार मंदिराचे विश्वस्त प्रा. चंद्रकांत अणे यांनी मानलेत.
Comments are closed.