बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या रविवारी शहरातील दीपक चौपाटी मच्छी मार्केट येथून एक मोटरसायकल चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून समुद्रपूर तालुका जिल्हा वर्धा येथून एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे. चंद्रकांत उर्फ शेखर शंकर कुटारकर (25) रा. गव्हा (कोल्ही) ता. समुद्रपूर जि. वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने नागपूर येथून चोरलेल्या एका दुचाकीची कबुली देखील पोलिसांना दिली.
फिर्यादी मारोती अर्जुन भानारकर (वय 62) हे भोईपुरा, स्टेट बँक मागे, वणी येथील रहिवासी आहे. रविवारी दि. 20 जुलै 2025 रोजी संध्यकाळी ते मासळी विक्रीसाठी दीपक चौपाटी मासळी मार्केट येथे गेले होते. त्यांनी आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 29CC1367) रस्त्याच्या कडेला चावी लावून उभी केली होती. रविवारी मार्केटचा दिवस असल्याने ग्राहकांची गर्दी होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांची मोटरसायकल सुरू करून टिळक चौकाकडे पळ काढला. भानारकर यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी सुरु केली. तसेच खबरी देखील कामाला लावले. दरम्यान पोलिसांना आरोपी हा वणीतील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे आढळले. त्यावरून त्यांनी त्या व्यक्तीची विचारपूस केली असता आरोपीची ओळख स्पष्ट झाली. सदर चोरटा हा गव्हा ता. समुद्रपूर जि. वर्धा येथील असल्याचे त्यांना कळले. त्यावरून वरिष्ठांनी पथक पाठवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दुचाकी चोरून ठेवायचा गहाण
गावात आरोपीकडून वणी येथून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान चौकशीत पोलिसांना बुटीबोरी नागपूर येथून चोरलेल्या एका दुचाकीबाबत आरोपीकडून माहिती मिळाली. आरोपीने सदर चोरलेली दुचाकी वणीतील एका व्यक्तीकडे 5 हजारात गहाण ठेवली होती. बाहेरगावचे दुचाकी चोरटे वणीत येऊन दुचाकी चोरत असल्याने वणीकरांचे टेन्शन तर वाढलेच आहे. सोबतच पोलिसांची ड़ोकेदुखी देखील वाढली आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार PSI धीरज गुल्हाने, पो.कॉ. मो. वसिम, पोकॉ मोनेश्वर खंडरे, पोकॉ गजानन कुडमेथे, गणेश मेश्राम पोकॉ नंदकुमार पुप्पुलवार यांनी केली.



Comments are closed.