मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न पोहोचला मानवाधिकार आयोगात

जिल्हाधिका-यांसह, एसटी महामंडळाचे अधिकारी व पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना समन्स

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिवाय तालुक्याचे मुख्यालय आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही बसस्थानक नाही. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार, आंदोलन झालीत. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अलिकडेच या प्रश्नाची मारेगाव येथील विधी अभ्यासक साहिल शेख आणि द प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष राजीव खोब्रागडे यांनी याबाबत राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत आयोगाने आता जिल्हाधिकारी (कलेक्टर) यवतमाळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि उप. अभियंता सा.बां. विभाग मारेगाव यांना समन्स पाठवले आहे. त्यांना दिनांक 11 मार्च रोजी आयोगासमोर वैयक्तिकरित्या किंवा रितसर अधिकृत प्रतिनिधीद्वारा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तक्रारीला संबंधित कागदपत्रांसह लिखित स्वरूपात प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

मारेगाव हे वणी यवतमाळ रोडवरील एक महत्त्वाचा तालुका आहे. विविध कार्यालय आणि बाजारपेठ असल्याने हजारो लोक मारेगावला येणे जाणे करतात. मात्र शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रतिक्षा कुठे करावी हा मोठा प्रश्न असतो. हिवाळ्यात तर काही समस्या नसते. मात्र पावसाळा आणि उन्हाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

विद्यार्थ्यांना मोठा त्रास
मारेगाव येथे सिनियर आणि ज्युनियर कॉलेज आहेत. याशिवाय फार्मसी, अध्यापक, आयटीआय, कृषी महाविद्यालये आहेत. यासह वणीला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी मारेगावला शिकण्यासाठी येतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लवकर निर्णयाची प्रतिक्षा – साहिल शेख
आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. आम्हाला विश्वास आहे की आयोगाच्या आदेशानंतर अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील व या प्रश्नी लवकर तोडगा निघेल
– साहिल शेख, सदस्य – द प्लॅटफॉर्म

काय होणार याकडे सर्वांचे लक्ष?
गेल्या अनेक वर्षांपासून मारेगाव बसस्थानकाचे घोंगडे भिजत आहे. याआधी लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी मारेगाव वासीयांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. आता यावेळी मानवाधिकार आयोगाने याची दखल घेतल्याने या प्रश्नी काय उत्तर निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.